महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुण्यातील जवळपास 400 नागरिकांनी " या "कारणामुळे टाकला मतदानावर बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 02:06 PM2019-10-21T14:06:37+5:302019-10-21T14:06:55+5:30
Pune Election 2019 : उमेदवार फिरकलेच नाहीत
पुणे : आंबील ओढयाला आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या आणि सात जणांचा बळी गेलेल्या टांगेवाला कॉलनीमधील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. मतदानाच्या दिवशी येथील नागरिकांनी मतदान केले की नाही याची पाहणी करीत 'लोकमत'ने नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी एकही उमेदवार प्रचारासाठी अगर मदतीसाठी फिरकला नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला असून मदत न मिळाल्याने मतदान न करण्यावर आम्ही ठाम असल्याचे सांगितले.
आंबील ओढ्याला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पुण्यात वीस पेक्षा अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. तीन ते साडेतीन हजार वाहनांचे नुकसान झाले होते. सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ मिश्रित पाणी घुसले होते. अनेक सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये अद्यापही गाळ साठलेला आहे. टांगेवाला कॉलनी, मोरे वस्ती, तावरे कॉलनी, मल्हार वसाहतीमध्ये तर पुराने कहर केला होता. टांगेवाला कॉलनिमधील अनेक घरे पडली होती. येथील सात जणांचा अंगावर भिंत पडल्याने तसेच वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. अजूनही या घरांची डागडुजी झालेली नाही. बहुतांश नागरिक ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहात आहेत. अनेकांना शासकीय कागदपत्रे आणि मदत मिळालेली नाही. जी मदत मिळाली ती तुटपुंजी आहे. याकडे प्रशासन, आमदार, खासदार आणि स्थानिक नगरसेवक लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही नागरिक या निर्णयावर ठाम असल्याचे दिसुन आले. प्रशासन आणि सर्वपक्षीय उमेदवारांबद्दल प्रचंड चीड नागरिकांच्या बोलण्यातून व्यक्त होत होती.
याठिकाणी एकूण 80 ते 85 घरे असून 400 च्या आसपास मतदार आहेत. आमची आणि आमच्या मताची किंमत तुम्हाला नसेल तर आम्हालाही तुम्हाला मतदान करायचे नाही असे खडे बोल नागरिक ऐकवीत आहेत. उमेदवारांनी तर प्रचारादरम्यान या भागात येणे टाळले. त्यांनी बाहेरून बाहेरूनच पळ लढल्याचा आरोप शेरु शेख, संजय शिंदे, नंदा शिंदे, अजीज शेख, चंदन भोंडेकर, कैलाश शिंदे, शैलेश चव्हाण, महंमद किरसुल, रेहाना शेख यांनी केला.