Maharashtra Election: राज ठाकरेंकडे जनता विरोधी पक्षाची धुरा देईल?; आठवलेंचा वेगळाच 'कॉन्फिडन्स'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 12:22 PM2019-10-16T12:22:23+5:302019-10-16T12:59:19+5:30
पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली.
पुणे : राज ठाकरे यांनी जरी विराेधी पक्ष म्हणून निवडून देण्याची भूमिका मांडली असली तरी नागरिक त्यांना विराेधी पक्षाचा कारभार साेपविणार नाहीत. यंदाच्या निवडणुकीत विराेधी पक्षच राहणार नाही. राज ठाकरे चांगले भाषण करतात परंतु केवळ भाषण करुन विकास हाेत नाही. ते बाळासाहेब ठाकरे यांची नक्कल करण्यात हुशार आहेत अशी टीका केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. पुण्यात आरपीआयचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट उपस्थित हाेते.
आठवले म्हणाले, आमच्या जाहीरनाम्यातून आम्ही आमची भूमिका मांडली आहे. येत्या निवडणुकीत राज्यात विराेधीपक्ष राहणार नाही. शरद पवार एकटे किल्ला लढवत आहेत. त्यांच्याबाबत आपुलकी आहे. शरद पवार पूर्वी शक्तीशाली पहिलवान हाेते, आता मी, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे शक्तीशाली पहिलवान आहाेत.
आरपीआय कमळाच्या चिन्हावर लढण्यावर ते म्हणाले, आम्हाला युतीमध्ये पाच जागा देण्यात आल्या. स्वतंत्र चिन्ह मिळण्यासाठी किमान एकूण मताच्या आठ टक्के मतदान मतदान मिळणे आवश्यक आहे. परंतु तितक्या जागा आम्हाला देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे आम्ही कमळावर लढण्याचा निर्णय घेतला. वस्तूतः मी कमळावर निवडणूक लढविण्यास उत्सुक नव्हताे.