Maharashtra Election 2019 : डिजिटल प्रचारातही रिक्षातून प्रचार करण्यावर भर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 07:27 PM2019-10-14T19:27:30+5:302019-10-14T19:40:30+5:30
डिजिटल व सोशल मीडियाच्या युगामध्येही निवडणुकीत प्रचारासाठी रिक्षांचा वापर महत्त्वाचा ठरतोय..
पुणे : आजचे युग हे सोशल माध्यमांचे युग आहे. सोशल माध्यमांचा प्रभाव सर्वत्र दिसून येतो. सोशल माध्यमांचा वापर सर्वच राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणावर करत आहेत. सध्या सर्वत्र निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. वॉर रूम, डिजिटल व सोशल मीडियाच्या युगामध्येही निवडणुकीत प्रचारासाठी रिक्षांचा वापर महत्त्वाचा ठरत आहे. यंदाही विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी शहरात रिक्षा रस्त्यांवर उतरल्या आहेत. गल्लोगल्ली रिक्षांवर भोंगा आणि स्पीकरमधून राजकीय पक्षांची गीते, उमेदवाराचा परिचय, प्रचाराची विविध गीतं वाजवली जात आहेत.
शहरात प्रमुख पक्षांबरोबर अपक्ष उमेदवारांकडून प्रचारासाठी सोशल मीडिया, पत्रके, कार्यकर्ते यांच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे. पण या सगळ्यांमध्ये मतदारसंघातील एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रचार करण्यासाठी रिक्षांचे महत्त्व कायम आहे. दोन्ही बाजूला पक्षाचे झेंडे, उमेदवाराचे छायाचित्र, नाव आणि निवडणुकीचे चिन्ह असलेले फलक तसेच एका बाजूला लावलेला भोंगा, अशा रिक्षा धावताना दिसत आहेत. पूर्वी रिक्षात बसलेल्या व्यक्तीकडून ध्वनिक्षेपकांवरून उमेदवाराचा प्रचार केला जात असे. बदलत्या काळात त्याची जागा आता आधीच ध्वनिमुद्रित केलेल्या गीतांनी घेतली आहे. विविध पक्षांचे गाणी नागरिकांच्या कानावर पडत आहेत. प्रचाराचा रिक्षा फिरत असल्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढू लागला आहे. प्रत्येक उमेदवार रिक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारंपर्यंत पोहचण्याचापर्यंत करीत आहे.
हजार ते बाराशे रुपये रोज
दररोज हजार ते बाराशे रुपये उत्पन्न मिळते. माईक, स्पीकर असे सर्व साहित्य संबंधित उमेदवारांकडून दिले जाते. सकाळ पासून ते संध्याकाळपर्यंत रिक्षातून प्रचार करण्यात येतो.
- राजेश कुंभार, रिक्षाचालक
परवानगी घेणे बंधनकारक
उमेदवारांच्या प्रचारासाठी वापरण्यात येणाºया रिक्षा आणि अन्य वाहनांसाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जाहिरात शुल्क भरणे आवश्यक आहे. त्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते. विनापरवानगी प्रचारात वाहनांचा वापर झाला तर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
चर्चा रंगू लागल्या
मतदानाला अवघे काही दिवस राहिले आहेत, त्यामुळे प्रचार जोर वाढला आहे. सर्वच राजकीय पक्ष, आप आपला प्रचार करीत आहे. शहरातील चौकाचौकात राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. प्रत्येक उमेदवारांनी आप आपले बुथ आणि प्रचार कार्यालय उघडले आहेत. तेथे देखील कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत.