Maharashtra election 2019 ; पुण्यात राज ठाकरेंची रद्द झालेली सभा होणार १४ तारखेला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 04:07 PM2019-10-10T16:07:54+5:302019-10-10T16:18:21+5:30
बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने रद्द झालेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रचारसभा सोमवारी अर्थात १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यापूर्वी आज म्हणजे गुरुवारी ठाकरे यांनी ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेतले. विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा नारळ फोडून त्यांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
पुणे : बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने रद्द झालेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रचारसभा सोमवारी अर्थात १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यापूर्वी आज म्हणजे गुरुवारी ठाकरे यांनी ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेतले. विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा नारळ फोडून त्यांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. राज यांचे पुत्र अमित ठाकरे हे यावेळी उपस्थित होते. राज यांनी गणरायाची आरती करुन त्याला निवडणूकीत मोठ्या संख्येने यश मिळावे याकरिता साकडे घातले.
विधानसभा निवडणूकीचा प्रचार आता रंगात येण्यास सुरुवात झाली आहे. राज यांनी कसबा गणपतीचे दर्शन घेऊन कार्यकर्त्यांना प्रचारास सुरुवात करण्याचे आदेश दिले आहेत. बुधवारी (9) सरस्वती विद्या मंदिरात राज यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. ईडीची कारवाई मागे लागल्यापासून जाहीररीत्या कुठलेही वक्तव्य करण्यास टाळणारे यादिवशी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र त्यादिवशी झालेल्या प्रचंड पावसामुळे ती सभा रद्द करावी लागली. यामुळे अनेकांची निराशा झाली. सभास्थानी झालेल्या राडारोड्यामुळे आयोजकांची पंचाईत होऊन बसली.
गुरुवारी राज कसबा गणपतीचे दर्शन घेणार असल्याची बातमी कार्यकर्त्यांमध्ये पसरली. त्यांनी मोठ्या संख्येने कसबा गणपती समोर गर्दी केली. दर्शन घेण्याकरिता राज दहा वाजता येणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात साडेअकरा वाजता राज कसबा गणपती मंदिरात आले. कार्यकर्त्यांनी ताशे आणि फटाके वाजवून त्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. यावेळी अनिल शिदोरे, शहरप्रमुख अजय शिंदे, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुहास निम्हण, पुणे कँन्टोमेंट विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मनिषा सरोदे यासह मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर राज हे माध्यमांशी संवाद साधणार असे वाटत होते. मात्र पत्रकारांनी त्यांना त्यासंबंधी विचारणा केली असता त्यावर ते काहीही न बोलता आपल्या पुढील प्रवासाकरिता मार्गस्थ झाले.