Maharashtra Election 2019 : शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे हा प्रचाराचा धागा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 12:29 PM2019-10-19T12:29:29+5:302019-10-19T12:32:03+5:30
Maharashtra Election 2019 : केंद्र व राज्य सरकारच्या कामामुळे यश मिळेलच..
भूमिका - पर्वती मतदारसंघ
- माधुरी मिसाळ -
शहरातील आठही मतदारसंघांमध्ये पुन्हा भाजपचे सर्व आमदार निवडून येतील. शहरामध्ये प्रचाराची चोख यंत्रणा राबविण्यात आली असून शिवसेना, आरपीआयसह मित्रपक्षांसोबत उत्तम समन्वय ठेवण्यात आला आहे. शहराच्या भाजपच्या कोअर कमिटीमध्ये मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांनाही समाविष्ट करून घेण्यात आलेले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आणि केलेल्या कामांची माहिती देणे हाच प्रचाराचा मुख्य धागा असल्याचे शहराध्यक्षा आणि पर्वतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांनी सांगितले.
मिसाळ यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. मिसाळ म्हणाल्या, की निवडणुकीच्या काही दिवस आधी शहराध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली. आठही मतदारसंघांमध्ये निवडणुकीची रचना पक्षाच्यावतीने लावण्यात आलेली आहे. पक्षाच्या या रचनेमुळे काम अधिक सोपे झाले आहे. इतर मतदारसंघांमध्ये शहराध्यक्ष म्हणून फिरावे लागले. परंतु, त्यासाठी फार वेळ द्यावा लागला नाही. पक्षाच्या कोअर कमिटीची दररोज रात्री बैठक असते. या बैठकीमध्ये मतदारसंघनिहाय कामकाजाचा आणि प्रचार यंत्रणेचा आढावा घेतला जातो. या बैठकीला मित्रपक्षांचे पदाधिकारीही उपस्थित असतात.
बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार दुसºया दिवशीची तयारी केली जाते. त्यानुसार, प्रचाराचे नियोजन केले जाते. या दररोजच्या समन्वय बैठकीचा मोठा उपयोग झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या सभेमुळे भाजपचे मताधिक्य वाढण्यास मदत मिळेल. मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काम, प्रदेश व शहरस्तरावरील कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल, अशी आशा मिसाळ यांनी व्यक्त केली.
प्रदेश कार्यकारिणीकडून गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारमधील नेत्यांचे दौरे आयोजिण्यात आले होते. या नेत्यांची ज्या मतदारसंघात आवश्यकता होती; त्यानुसार नियोजन करण्यात आले होते. याचाही मोठा उपयोग प्रचारादरम्यान झाल्याचे मिसाळ यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाचे महापालिकेमध्ये ९८ नगरसेवक आहेत. तसेच एक खासदार आणि आठ आमदार आहेत. या सर्व लोकप्रतिनिधींच्या जनसंपर्काचा आणि कामाचा निश्चितच फायदा होतो आहे. शहर पातळीवर काम करणारे पदाधिकारी, स्थानिक पातळीवरील नगरसेवकांचे आणि पदाधिकाऱ्यांचे काम महत्वाचे ठरले. पक्षाचे मुद्दे घेऊन जाताना नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत केले आहे. नगरसेवकांमुळे तर प्रचार यंत्रणा अधिक सक्षम झाली. बूथस्तरापासून पोलिंग एजंटपर्यंत त्यांचा महत्त्वाचा वाटा
असतो. शिवसेनेसोबत भाजपच्या उत्तम समन्वय आहे.
शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग आम्हाला लाभला. प्रचार यंत्रणेमध्ये सर्व शिवसैनिक सहभागी झाले आहेत.