महाराष्ट्र निवडणूक २०१९ : कॅन्टोन्मेंटमधील मतदानाची सुरुवात अन शेवट कासवगतीनेच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 07:00 AM2019-10-22T07:00:00+5:302019-10-22T07:00:04+5:30
Pune Cantonment board Election 2019 : कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात एकूण 30 जागांवरील 274 केंद्रांमध्ये मतदान पार पडले.
पुणे : मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाकडून सातत्याने मतदारांना आवाहन करण्यात आले असले तरी दुसरीकडे प्रत्यक्षात बहुतांशी मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत केवळ 38.14 टक्के मतदान झाले आहे. यंदाच्या वर्षी मोठ्या संख्येने मतदान होईल असा अंदाज बांधणाऱ्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. सकाळी सात वाजल्यापासून सुरु झालेल्या मतदानास सुरुवातीपासूनच अल्प प्रतिसाद मिळाल्याचे पाहवयास मिळाले.
वेधशाळेने मतदानावर पावसाचे सावट असल्याचा अंदाज यापूर्वी नोंदविला होता. मात्र पावसाने अंदाज खोटा ठरवला. सकाळी ढगाळ हवामान असल्याने पाऊस पडणार असल्याची शक्यता होती. प्रत्यक्षात मतदान संपेपर्यंत पाऊसाने दडी मारली. परंतु मतदानाला येणाऱ्यांची संख्या जेमतेम होती. सेंट मीराज इंग्लिश मिडीयम सेकंडरी स्कूल, सरस्वती विद्या युनियन हायर सेकंडरी स्कूल, तसेच महात्मा ज्योतिबा फुले मुलीचे हायस्कूल या केंद्रावर सकाळी मतदानास चांगला प्रतिसाद मिळाला. तर पुणे इस्लामिया उर्दु प्राथमिक शाळा, महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक विद्यालयात तुलनेने कमी गर्दी दिसून आली. दुपारनंतर मतदानाचा ओघ वाढला होता. साधारण दोन नंतर मतदानाची टक्केवारीत वाढ झाली होती. तीन पर्यंत 27.11 टक्के मतदान या मतदारसंघात झाले. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरु असणा-या पावसाने अनेक केंद्रांमध्ये चिखलाचे साम्राज्य पसरले होते. विशेषत: महात्मा फुले मुलांची शाळा या भागात राडारोडा झाल्याने मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचण्याकरिता कसरत करावी लागत होती. यावेळी प्रशासनाकडून येण्या जाण्याकरिता लाकडी फळ्या टाकण्यात आल्या होत्या.
दुपारी 4 नंतर मात्र मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होती. शेवटच्या टप्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त मतदान केंद्राबाहेर ठेवण्यात आला होता. कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात एकूण 30 जागांवरील 274 केंद्रांमध्ये मतदान पार पड्ले. याकरिता एकूण 1 हजार 482 कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आले होते. तसेच 27 केंद्रावर वेबकास्टींगची सोय करण्यात आली होती. याशिवाय दिव्यांग मतदारांच्या मतदानाकरिता विशेष व्यवस्था कार्यरत होती.
मतदारांचा मतदानाचा उत्साह वाढ
सोमवारी सकाळी वाजेपर्यंत 3.15 टक्के एवढे मतदान झाले होते. दुपारी 1 वाजता मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी 18.90 टक्के एवढी होती.