पुण्यात सर्वपक्षीय बंडखोरीचे ग्रहण ; उमेदवारांचे धाबे दणाणले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 06:56 PM2019-10-03T18:56:21+5:302019-10-03T19:04:59+5:30
पुणे शहर आणि ग्रामीण भागात महायुतीसोबत महाआघाडीलाही बंडखोरीचे ग्रहण लागले असून कोणत्याही राजकीय पक्षाला बंडखोरांना थोपवणे शक्य झालेले दिसून येत नाही. त्यामुळे अनेक उमेदवारांचे धाबे दणाणले असून या बंडोबांचे बंड थंड कसे करायचे याच चिंतेत अनेकजण आहेत.
पुणे : पुणे शहर आणि ग्रामीण भागात महायुतीसोबत महाआघाडीलाही बंडखोरीचे ग्रहण लागले असून कोणत्याही राजकीय पक्षाला बंडखोरांना थोपवणे शक्य झालेले दिसून येत नाही. त्यामुळे अनेक उमेदवारांचे धाबे दणाणले असून या बंडोबांचे बंड थंड कसे करायचे याच चिंतेत अनेकजण आहेत.
याची सुरुवात कसबा पेठ मतदार संघातून झाली असून तिथे भाजपच्या मुक्ता टिळक यांना शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी आव्हान दिले आहे. शहरात शिवसेनेला लढण्यासाठी एकही जागा न दिल्याने धनवडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.तिथेच काँग्रेसच्या अरविंद शिंदेसमोर काँग्रेसचा पाठिंबा असणारे रवींद्र धंगेकरही मैदानात उतरणार आहेत. दुसरीकडे पर्वतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी कदम यांना काँग्रेसच्या आबा बागुल यांचे आव्हान असणार आहे. पाच टर्म नगरसेवक असलेल्या बागुल यांनी उद्या अर्ज भरणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मावळमध्ये तर वातावरण तणावग्रस्त असून भाजपच्या बाळा भेगडे यांच्यासमोर आता राष्ट्रवादीत गेलेले पण मूळचे भाजपचे असलेले सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीतून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे तिथेही जोरदार लढत बघायला मिळेल. खडकवासला मतदारसंघात भाजपच्या भीमराव तापकीर यांच्यासमोर शिवसेनेच्या रमेश कोंडे यांनी उमेदवारी दाखल केली असून तिथेही संघर्ष उभा राहणार आहे.
अजून अर्ज दाखल करण्यास एक दिवस असल्यामुळे अजूनही बंडखोर वाढू शकतात आणि माघार घेण्यासाठी वेळ असल्यामुळे काही उमेदवारी मागेही घेऊ शकतात. पण सध्या तरी पुण्याचे चित्र बघितल्यास तुल्यबळ प्रतिस्पर्धी आणि बंडखोर या दोघांचेही दडपण समोरच्या उमेदवार असणार आहे.