Maharashtra Election 2019 : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा चंद्रकांत पाटलांना पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 06:49 PM2019-10-05T18:49:25+5:302019-10-05T18:51:22+5:30
उमेदवारी जाहीर झाल्यापासून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना अनेक कारणांनी विरोध होत आहे...
पुणे : कोथरूड मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्यापासून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना अनेक मुद्दे उपस्थित करून विरोध होत आहे. कधी त्यांना स्थानिक उमेदवार नसल्याचे कारण देत लक्ष्य केले गेले तर कधी जातीयतेचा मुद्दा उपस्थित ब्राहमण महासंघाने त्यांना विरोध दर्शवला. दुसरीकडे काँग्रेस- राष्ट्रवादीसह विरोधकांनी मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा देत '' दादां ''ना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, अखिल भारतीय महासंघाने चंद्रकांत पाटलांना पाठिंबा जाहीर केला असल्याची घोषणा एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
संपूर्ण राज्यात लक्षवेधी असलेल्या पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विरुद्ध मनसेचे किशोर शिंदे असा रंगतदार सामना रंगणार आहे . त्यापार्श्वभूमीवर ब्राम्हण महासंघाचे पदाधिकारी आणि चंद्रकांत पाटील यांच्यात बैठक पार पडली. त्यात ब्राह्मण समाजाच्या समस्या आणि मागण्या यासंदर्भात चर्चा झाल्यानंतर महासंघाने एका पत्रकाद्वारे दादांच्या पाठिंब्याची घोषणा केली. मात्र त्यामुळे ब्राह्मण समाजाच्या मतात विभागणी होण्याची शक्यता होती. यावेळी ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, प्रदेश अध्यक्ष मोहिनी पत्की, पुणे जिल्हाध्यक्ष आनंद दवे उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कि, ब्राम्हण महासंघाचा माझ्या उमेदवारीला विरोध नाही, तर त्यांच्या काही मागण्या आहेत, ज्या सरकारने अद्याप पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा रोष सरकारवर आहे. पण सध्या आचारसंहिता असल्यामुळे त्यांच्या मागण्यांवर निर्णय होत नाही. आचारसंहिता समाप्त होताच आम्ही त्यांच्या मागण्यांचा नक्कीच विचार करू. त्यामुळे ब्राह्मण महासंघाचा उमेदवार माघार घेईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.