पुढील वीस दिवसात कृत्रिम पावसाचा प्रयोग ; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 06:10 PM2019-07-19T18:10:39+5:302019-07-19T18:16:37+5:30
राज्यातील पावसाचे प्रमाण बघता पुढील वीस दिवसात कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार असल्याची माहिती कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी दिली
पुणे : राज्यातील पावसाचे प्रमाण बघता पुढील वीस दिवसात कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार असल्याची माहिती कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी दिली. पुण्यात झालेल्या कृषी आढावा बैठकीनंतरच्यापत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यंदा राज्यात अजूनही हवा तसा पाऊस झालेला नाही. त्यातच पावसाने अनेक भागात विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांवर दुष्काळाची टांगती तलवार आहे. अशावेळी कृत्रिम पावसाची मदत सरकार घेणार आहे. विशेषतः जुलै महिन्याच्या शेवटच्या आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात या प्रयोगाची शक्यता आहे.
याबाबत बोंडे म्हणाले की, 'कृत्रिम पावसाच्या या प्रयोगासाठी 31 कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात मंजूर केला आहे. साधारण जुलैच्या अखेरीस पहिला प्रयोग मराठवाड्यात केला जाईल. आकाशात पावसाळी ढग निर्माण झाल्यावर हवामान खात्यातील तज्ज्ञांशी बोलून ढगात रसायन फवारून असा पाऊस पाडण्यात येईल. यासाठी नागपूर, औरंगाबाद आणि सोलापूर येथे रडार बसवण्यात आले आहेत'.
कृत्रिम पावसाच्या बाबतचे अधिक मुद्दे पुढीलप्रमाणे :
- अद्याप राज्यात कोठेही कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरु झालेले नाहीत.
- प्रयोगाची सुरुवात मराठवाड्यातून
- कृत्रिम पावसाच्या या प्रयोगासाठी 31 कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात मंजूर
- कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विविध 10 परवानग्या लागतात त्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता