Maharashtra: व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या सीईटी अर्जास मुदतवाढ
By प्रशांत बिडवे | Published: January 31, 2024 05:35 PM2024-01-31T17:35:32+5:302024-01-31T17:40:02+5:30
या परीक्षांकरिता उमेदवारांच्या नाेंदणी डाटाची तपासणी केली असता अनेक उमेदवारांचे अर्ज अपूर्ण असल्याचे आढळून आलेले आहेत...
पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष सीईटी सेलच्या वतीने विधी, एमबीए, बीएड, बीपीएड, एमआर्च. बी डिझाइन आदी विविध व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या प्रवेशपूर्व परीक्षा सीईटीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षांकरिता उमेदवारांच्या नाेंदणी डाटाची तपासणी केली असता अनेक उमेदवारांचे अर्ज अपूर्ण असल्याचे आढळून आलेले आहेत. तसेच अनेक उमेदवार आणि पालकांनी सीईटी अर्ज भरण्यास विलंब झाल्यामुळे मुदतवाढ मिळावी, यासाठी कार्यालयास विनंती केली हाेती. उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून राज्य सीईटी सेलच्या वतीने अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे.
बीएड, एमएड (३ वर्षे एकात्मिक), एमएड आणि एमपीएड सीईटीसाठी यापूर्वी (दि. २९ जानेवारी), बीएड (नियमित व विशेष) आणि बीपीएड (दि. ३० जानेवारी) विधी (३ वर्षे) आणि एमबीए एमएमएस सीईटी (दि.३१ जानेवारी) तसेच एमआर्च, एम. एचएमसीटी, एमसीए, बी-डीझाइन, बी-एचएमसीटी सीईटीसाठी १ फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली हाेती. त्यामध्ये आता सर्व सामाईक परीक्षांसाठी ६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज नाेंदणीचे वेळापत्रक व माहिती पुस्तिका, तसेच सामाईक परीक्षेचा संभाव्य दिनांक याबाबत अधिक माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.mahacet.org उपलब्ध करून देण्यात आली आहे.