Maharashtra: दोन महिन्यांत वाढले पावणेसहा लाख मतदार; निवडणुकीपूर्वी आणखी दोन लाख वाढणार
By नितीन चौधरी | Published: March 4, 2024 06:20 PM2024-03-04T18:20:41+5:302024-03-04T18:21:35+5:30
मतदार नोंदणीसाठी सुरू असलेल्या सततच्या मोहिमेमुळे नवमतदारांची संख्या वाढल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे...
पुणे : गेल्या दोन महिन्यांत राज्यात तब्बल पावणेसहा लाख नवमतदारांची भर पडली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी आणखी दोन लाख मतदारांची नावे समाविष्ट करण्यात येणार आहेत. याच काळात सुमारे १ लाख ८७ हजार नावे वगळण्यासाठी अर्ज प्राप्त झाले असून आतापर्यंत १ लाख नावे वगळण्यात आली आहेत. मतदार नोंदणीसाठी सुरू असलेल्या सततच्या मोहिमेमुळे नवमतदारांची संख्या वाढल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार असल्याने निवडणूक कार्यालयांना निर्धारित वेळेत अर्ज भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात, राज्याला मतदार नोंदणी, नावे वगळणे आणि नाव-पत्ता बदलासाठी एकूण १४ लाख ७१ हजार लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील सर्व प्रकारांमधील ९ लाख ८४ हजार अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात नवमतदारांची संख्या ५ लाख ७३ हजार ८९१ असून १ लाख ४ हजार ६४४ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. यात सर्वाधिक ९५ हजार ३९५ नवमतदारांनी ठाणे जिल्ह्यात अर्ज केले आहेत. त्यापैकी ७१ हजार ५२२ मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत, तर ९१ हजार ६९३ नवमतदारांनी पुणे जिल्ह्यात अर्ज केले आहेत. त्यापैकी ६२ हजार ३१८ मतदारांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत, तर अजूनही २२ हजार ६१२ अर्जांवर कार्यवाही सुरू आहे.
नावे वगळण्यासाठी राज्यभरातून १ लाख ८७ हजार ८०७ अर्ज आले आहेत. त्यापैकी १ लाख ४ हजार ६४४ नावे वगळण्यात आली आहेत, तर ५७ हजार ६९६ अर्जांवर कार्यवाही पूर्ण करून ही नावेही वगळण्यात येणार आहेत, तर नाव, पत्ता, मतदान केंद्रांत बदल करण्यासाठी ४ लाख ६२ हजार ७ मतदारांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी ३ लाख ५ हजार ९९९ मतदारांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर, मतदार अर्ज मतदार यादीत समाविष्ट केले जातील. त्यासाठी कायदेशीर प्रक्रियेला पुन्हा सात दिवस लागतात, त्यामुळे नामांकन दाखल करण्याआधी एक आठवडा सर्व अर्जांवर कार्यवाही केली जाईल, अशी माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.