स्केटिंगमध्ये महाराष्ट्राच्या मुलींना सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:10 AM2021-04-18T04:10:17+5:302021-04-18T04:10:17+5:30
पुणे - भारतीय रोलर स्केटिंग महासंघाच्या वतीने ७ ते १० एप्रिल २०२१ या कालावधीत चंदीगड येथे झालेल्या ५८ ...
पुणे - भारतीय रोलर स्केटिंग महासंघाच्या वतीने ७ ते १० एप्रिल २०२१ या कालावधीत चंदीगड येथे झालेल्या ५८ व्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धा २०२०-२१ मध्ये महाराष्ट्राच्या मुलींच्या टीमने सुवर्णपदक पटकाविले. सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्राने सुवर्णपदक मिळविले आहे. यामध्ये पुण्यातील मुलींचे वर्चस्व राहील आहे. रोलर डर्बी या प्रकारात अंतिम सामना महाराष्ट्र आणि तमिळनाडू यांच्यात रंगला होता. हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. तमिळनाडूचा १४-१७ ने पराभव केला. लिग पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने उत्तर प्रदेश, पंजाब व आंध्र प्रदेश टीमचा पराभव करून अंतिम सामना गाठला.
पुण्यातील खेळाडू तनिष्का सिंग, वैदेही सरोदे, श्रुतिका सरोदे, सिद्धी नलावडे, मृगनयनी शिंदे, विश्वश्री बर्वे, विभा मुठेकर यांनी धडाकेबाज खेळ केला.
या सर्व मुलींचा सराव पुण्याचे प्रशिक्षक दीपक पवार व आशुतोष जगताप यांनी घेतला. महाराष्ट्र स्केटिंग असोसिएशन तर्फे आदेश सिंग यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.