शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींची तरतूद ; उर्वरित मदत केंद्राकडे मागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 02:50 PM2019-11-04T14:50:00+5:302019-11-04T14:57:22+5:30
राज्यात दीर्घकाळ मुक्काम केलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याकरिता प्राथमिक स्तरावर १० हजार कोटींची तरतुद करण्यात आले असून उर्वरित मदत केंद्राकडे मागणार असल्याचे महसूलमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
पुणे : राज्यात दीर्घकाळ मुक्काम केलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याकरिता प्राथमिक स्तरावर १० हजार कोटींची तरतुद करण्यात आले असून उर्वरित मदत केंद्राकडे मागणार असल्याचे महसूलमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
पुरंदर तहसील कार्यालयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. त्या आधी त्यांनी पुरंदर तालुक्यातील भिवरी, बोपदेव, चांबळी आणि हिवरे भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी येत्या ६ नोव्हेंबरपर्यंत सर्व नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले.
पुढे ते म्हणाले की, वेगवेगळ्या भागातले नुकसान वेगवेगळे आहे. जसे की मावळमध्ये तांदूळ पिकाचे नुकसान झाले आहे. पुरंदरमध्ये फळ बागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे परतावाही वेगवेगळ्या प्रमाणात असेल.प्राथमिक अंदाज घेऊन १० हजार रुपये प्रति हेक्टर जाहीर केले आहेत. मात्र नंतर नुकसान बघून तो वाढवून मिळेल असेही त्यांनी जाहीर केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याच्या रकमेव्यतिरिक्त किती नुकसान भरपाई द्यावी लागेल याची चाचपणी सुरु आहे. फळबागांच्या नुकसानाचा पंचनामा प्रशासन करत नसल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली.त्यावर पाटील यांनी प्रशासनाला 'माणूस गरीब आहे की श्रीमंत हे महत्वाचे नाही. तर आजारी आहे हे महत्वाचे असते. त्याचप्रमाणे शेतकरी फळ पिकवतो की भाजीपाला यापेक्षा त्याचे नुकसान झाले आहे हे अधिक महत्वाचे सांगितले, असे सांगून पंचनाम्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांसाठी जमले ते सगळे करू अशी ग्वाहीही त्यांनी दिली.