महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात ९० बिबट्यांचा झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 06:47 AM2019-02-05T06:47:55+5:302019-02-05T06:48:17+5:30
बिबटे आता शहरातही येत आहेत. त्यामुळे मानव आणि वन्यप्राणी संघर्षात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. बिबट्याची दहशत पसरलेली असताना त्यांच्या मृत्यूमध्येही वाढ होत आहे.
- श्रीकिशन काळे
पुणे : बिबटे आता शहरातही येत आहेत. त्यामुळे मानव आणि वन्यप्राणी संघर्षात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. बिबट्याची दहशत पसरलेली असताना त्यांच्या मृत्यूमध्येही वाढ होत आहे. गेल्या वर्षभरात देशात झालेल्या बिबट्यांच्या एकूण मृत्यूंपैकी सर्वाधिक ९० मृत्यू महाराष्टÑात झाले होते. रस्ते अपघात, शिकार, ग्रामस्थांकडून मारणे आदी प्रकारांमुळे मृत्यूमध्ये वाढ झाली आहे.
देशात सध्या १४ हजारच्या जवळपास बिबट्यांची संख्या आहे. ही आकडेवारी वाइल्डलाइफ प्रोटेक्शन सोसायटी आॅफ इंडियाने केलेल्या सर्व्हेमधून समोर आली आहे. तसेच डिसेंबर २०१८ मध्ये लोकसभेत केंद्रीय वनमंत्र्यांनीही आकडेवारी सादर केली. २०११ ते १०१७ मध्ये महाराष्टÑातच २ लाखाहून अधिक वन्यप्राणी आणि मानवाच्या संघर्षाच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये वन विभागाने ४ कोटीहून अधिक रूपयांची भरपाई दिली आहे. देशात १९९४ ते २०१८ दरम्यान सुमारे ४६९८ बिबट्यांना बेकायदा मारण्यात आले.
नाशिकमध्ये ४१ जेरबंद
दोन वर्षांमध्ये नाशिक जिल्ह्यात एकूण ४१ बिबटे वनविभागाने जेरबंद केले आहेत. जिल्ह्यामधील प्रत्येकी नऊ तालुक्यांनुसार वनविभागाने पूर्व-पश्चिम असे दोन भाग केले आहे. पूर्व भागात दोन वर्षांत २४, तर पश्चिमध्ये १७ असे एकूण ४१ बिबटे जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे.
बिबटे हे आता मानवी वस्तीत सहज राहत आहेत. कोणी अचानक समोर आले तर ते हल्ला करतात. बिबट्यांच्या मृत्यूची संख्याही वाढत आहे. सोसायटीतर्फे केलेल्या सर्व्हेमध्ये हे समोर आले आहे. - निकित सुर्वे, वन्यजीव संशोधक, वाइल्ड लाइफ कॉन्झर्व्हेशन सोसायटी आॅफ इंडिया
२०१८ मधील मृत्यू
महाराष्टÑ : ९० । उत्तराखंड : ९३
राजस्थान : ४६ । मध्य प्रदेश : ३७
उत्तर प्रदेश : २७ । कर्नाटक : २४
हिमाचल प्रदेश : २३
मृत्यूची कारणे
शिकार : १५५ । अपघात : ७४
ग्रामस्थांचे हल्ले : २९
वन विभागाची कारवाई : ८
नैसर्गिक मृत्यू व
इतर कारणांनी : १९४ मृत्यू