आपल्या मातीतील कलावंतांची महाराष्ट्राला किंमतच नाही राहिली; सुबोध भावेंची खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 11:23 AM2024-05-03T11:23:46+5:302024-05-03T11:24:14+5:30
मराठी म्हणून केवळ स्वाभिमान न बाळगता चिकाटी, सातत्य आणि कष्टाच्या जोरावर मराठी तरुणांनी सिद्ध होणे ही काळाची गरज
पुणे : आपल्या मराठी मातीने आपल्याला छत्रपती शिवरायांसारखे कणखर नेतृत्व दिले, लोकमान्यांसारखे विचारवंत दिले, बालगंधर्वांसारखे अस्सल कलावंत दिले. ही यादी भरपूर मोठी आहे, मात्र, दुर्दैव असे की आपल्या मातीमधील या दिग्गजांची, त्यांनी आपल्यासाठी केलेल्या कार्याची, दिलेल्या बलिदानाची महाराष्ट्राला किंमत राहिलेली नाही, अशी खंत प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी व्यक्त केली.
साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा यंदाचा कलादीप पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध कवी डॉ. पं. संदीप अवचट यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत सुबोध भावे बोलत होते. स्वा. सावरकर अध्यासन केंद्रात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे आणि कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर उपस्थित होते.
भावे म्हणाले की, नाटकाच्या माध्यमातून मी कलाक्षेत्रात आलो तरीही नाटक, मालिका आणि चित्रपट या तीनही माध्यमांत काम करायला मला आवडतं. मात्र, समाधान देणारी भूमिका किंवा चांगले मानधन या दोन्हीपैकी कोणती तरी एक गोष्ट मिळाली पाहिजे, असा माझा कटाक्ष असतो. नाटक हा मराठी भूमीचा एक अत्यंत महत्त्वाचा श्वास आहे. आपल्याकडे नाटक केवळ पाहिले जात नाही, तर आपण नाटक साजरे करीत असतो. आपल्या या परंपरा टिकवून ठेवत असतानाच मराठी म्हणून केवळ स्वाभिमान न बाळगता चिकाटी, सातत्य आणि कष्टाच्या जोरावर मराठी तरुणांनी सिद्ध होणे ही काळाची गरज आहे, असेही भावे म्हणाले.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले की, चित्रपट आणि एकूणच कला क्षेत्रातदेखील कामगारांचे योगदान मोठे असते. मुख्य म्हणजे कोणत्याही प्रकारची काम करणारी व्यक्ती ही कामगार असते, कारण त्या कामासाठी त्याला श्रम करावे लागतात.