Maharashtra | पुढील ४ दिवसांत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
By नितीन चौधरी | Published: April 4, 2023 05:53 PM2023-04-04T17:53:25+5:302023-04-04T17:56:35+5:30
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार यामुळे हवेची विसंगती तयार झाली आहे...
पुणे : विदर्भापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत एक द्रोणिका रेषा तयार झाली असून विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत पुढील चार-पाच दिवसांत मेघगर्जना व विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार यामुळे हवेची विसंगती तयार झाली आहे. परिणामी बंगालच्या उपसागरावरून राज्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. त्याचवेळी कमाल तापमानातही वाढ झाल्याने दुपारी व सायंकाळी ढगाळ वातावरणामुळे मेघगर्जनेसह राज्यात बहुतांश जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच गुरुवारी दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांत तर शुक्रवारी (दि. ७)उत्तर कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्र वगळता राज्याच्या अन्य जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे.
शनिवारीही मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग मराठवाड्याच्या उत्तर भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, अशी माहिती हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली. या ३ दिवसांत राज्याच्या काही भागांमध्ये कमाल सरासरी तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअस वाढ अपेक्षित असून त्यानंतर दोन दिवसांत किरकोळ घसरण होण्याची शक्यता आहे.
पुण्यातही हलक्या पावसाची शक्यता
शहरात मंगळवारी (दि. ४) दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार झाले होते. दिवसा कमाल तामपानात झालेली वाढ आणि आर्द्रता यामुळे कोथरूड, सातारा रस्ता, वानवडी परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार गुरुवार ते रविवारपर्यंत हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच दुपारनंतर वातावऱ्ण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.