MAHARASHTRA HSC RESULT 2022 | बारावीच्या परीक्षेचा निकाल म्हणजे आयुष्याचा नव्हे!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 01:16 PM2022-06-08T13:16:09+5:302022-06-08T13:19:01+5:30

वास्तव स्वीकारा : मानसोपचारतज्ञांचा पालक आणि मुलांना सल्ला

MAHARASHTRA HSC 12th RESULT 2022 Twelth standard result is not life | MAHARASHTRA HSC RESULT 2022 | बारावीच्या परीक्षेचा निकाल म्हणजे आयुष्याचा नव्हे!

MAHARASHTRA HSC RESULT 2022 | बारावीच्या परीक्षेचा निकाल म्हणजे आयुष्याचा नव्हे!

Next

पुणे : कोरोनाच्या दोन वर्षांच्या संकटानंतर यंदा बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने पार पडल्या. बुधवारी दुपारी बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर होत आहे. काही विद्यार्थ्यांचा निकाल अनपेक्षित लागला की, पालकांसह मुलांमध्येही प्रचंड मानसिक ताण निर्माण होतो. निकाल कसाही लागला तरी तो सकारात्मकतेने स्वीकारा. कारण हा केवळ बारावीच्या परीक्षेचा निकाल आहे, आयुष्याचा नव्हे, असा सल्ला मानसोपचारतज्ञांनी दिला आहे.

मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत पालकांना समाजाचे आणि मुलांना पालकांचे खूप टेन्शन असते. माझ्या मुलाला कमी गुण मिळाले, तर लोक काय म्हणतील, असा प्रश्न पालकांना सतावत असतो. दुसरीकडे, पालकांना अपेक्षित असलेले गुण मला मिळाले नाहीत, तर पालक काय करतील, या ताणाचा मुले सामना करत असतात. बारावीचा निकाल म्हणजे जणू काही अग्निपरीक्षाच, असे मानून सर्व जण आतुरतेने निकालाची वाट पाहत असतात. मात्र, मुलांना कमी गुण मिळाले तरी पालकांनी मुलांना भावनिक आधार द्यावा, असे आवाहन समुपदेशकांनी केले आहे.

निकालाच्या दिवशी काय काळजी घ्यावी?

- निकाल जाहीर होण्यापूर्वी मित्रपरिवार, नातेवाइकांचे फोन घेऊ नयेत. निकाल काय लागेल, याबाबत चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही.

-निकालाच्या दिवशी संयम, सकारात्मकता बाळगा.

- निकाल अनपेक्षित असेल तरी पालक आणि मुलांनी एकमेकांना भावनिक आधार द्यायला हवा.

- परीक्षेत अपयश आले म्हणून आयुष्य संपवण्याचा विचार करण्यात काहीच अर्थ नाही.

बारावी ही आयुष्यातील शेवटची परीक्षा नसते. त्यानंतरही करिअरचे अनेक पर्याय मुलांसमोर उपलब्ध असतात. त्यामुळे परीक्षेचा निकाल कसाही लागला तरी तो पालक आणि मुलांनी स्वीकारायला हवा. पालकांनी मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नये. मुले पुन्हा चांगला अभ्यास करून बारावीची परीक्षा देऊ शकतात आणि यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे निकालाच्या दिवशी मानसिक तणावाखाली न राहता सकारात्मकतेने परिस्थितीला सामोरे जावे.

-डॉ. अर्चना जावडेकर, मानसोपचारतज्ञ

आपण परीक्षेत कसे पेपर लिहिले आहेत आणि साधारण किती गुण मिळू शकतात, याची मुलांना कल्पना असते. मात्र, पालकांच्या दडपणामुळे पेपर चांगले गेले आहेत, असे मुले सांगतात. निकालाच्या दिवशी पालकांच्या अपेक्षेइतके गुण मुलांना न मिळाल्यास पालक निराश होतात. त्यांचे दडपण आपोआपच मुलांवर येते. अशा परिस्थितीत एकमेकांना भावनिक आधार देणे आवश्यक असते. मुलांना नैराश्याच्या गर्तेत न ढकलता पुढील प्रयत्नांसाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहन द्यायला हवे.

-डॉ. निकेत कासार, मानसोपचारतज्ज्ञ

Web Title: MAHARASHTRA HSC 12th RESULT 2022 Twelth standard result is not life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.