Maharashtra: उकाडा वाढण्याऐवजी पडतेय चक्क थंडी! राज्यात नाशिकला सर्वांत कमी किमान तापमान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 11:45 AM2024-02-26T11:45:23+5:302024-02-26T11:45:59+5:30
वाऱ्यांच्या परस्पर क्रियेमुळे राज्यामध्ये येत्या ७२ तासांमध्ये कोकण व्यतिरिक्त संपूर्ण भागात मेघगर्जना, सोसाट्याचा वारा, विदर्भात गारपीट होईल...
पुणे : उत्तरेकडील वाऱ्यांमुळे राज्यात अनेक ठिकाणी थंडीचा कडाका जाणवत आहे. उकाड्याच्या महिन्यात थंडीने नागरिक कुडकुडत आहेत. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नाशिकमध्ये १०.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर पुण्यातही १०.९ अंशावर तापमान होते. येत्या ७२ तासांत विदर्भात पावसासह गारपीट होईल, असा अंदाज देण्यात आला आहे.
वाऱ्यांच्या परस्पर क्रियेमुळे राज्यामध्ये येत्या ७२ तासांमध्ये कोकण व्यतिरिक्त संपूर्ण भागात मेघगर्जना, सोसाट्याचा वारा, विदर्भात गारपीट होईल. अमरावती, भंडारदरा, गोंदिया, नागपूर, वर्धा येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत कोकणात हवामान कोरडे राहील. मध्य महाराष्ट्रात आकाश अंशत: ढगाळ राहील. मराठवाड्यात ७२ तासांत तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. २८ तारखेनंतर हवामान कोरडे राहील. विदर्भातील काही जिल्ह्यांत २६ व २७ तारखेला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. उत्तरेकडील वाऱ्यांमुळे पुण्यासह राज्याच्या काही भागांतील किमान आणि कमाल तापमानात काहीशी घट पाहायला मिळाली. राज्यामध्ये सर्वांत कमी किमान तापमान नाशिकला १०.२, तर सर्वाधिक कमाल तापमान सोलापुरात ३७.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
पुणे व परिसरात आकाश निरभ्र राहील. २६ व २७ तारखेला आकाश ढगाळ राहील. १ मार्चनंतर पुन्हा वातावरण ढगाळ होईल. येत्या ४८ तासांत किमान तापमानात वाढ होईल आणि कमाल तापमानात काही परिणाम होणार नाही.
राज्यातील कमाल व किमान तापमान
पुणे : ३३.६ : १०.९
नाशिक : ३१.० : १०.२
सातारा : ३४.३ : १४.५
मुंबई : ३२.७ : १९.५
रत्नागिरी : ३१.४ : १६.८
छ. संभाजीनगर : ३२.२ : १५.७
सोलापूर : ३७.२ : १९.६
राज्यातील अमरावती, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काही भागात थंडीचा कडाका जाणवू शकतो. नाशिकनंतर पुण्यात १० अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले.
-अनुपम कश्यपी, प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे