महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी; योगी आदित्यनाथ यांचे गौरवोद्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 05:04 PM2024-02-11T17:04:07+5:302024-02-11T17:04:22+5:30
अगदी लहान असताना संत ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचली, तेव्हापासून आळंदीत येण्याची इच्छा होती, आज ती पूर्ण झाली
आळंदी : महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे. कारण इथं संतांचं सान्निध्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती सर्वांना सर्वश्रुत आहे असे गौरवोद्गार उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले.
तीर्थक्षेत्र आळंदीत परमपूज्य गोविंददेव गिरी महाराज यांच्या जन्मोत्सव निमित्त आयोजित 'गीताभक्ती अमृत महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. योगी आदित्यनाथ म्हणाले, मला आळंदी भूमीत येण्याचं सौभाग्य लाभलं. मी सनातन धर्मासाठी काम करत आलेलो आहे. त्यामुळे मी ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमीला नतमस्तक करतो. अगदी लहान होतो तेव्हा ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचली. तेव्हापासून आळंदीत येण्याची इच्छा होती. आज ती पूर्ण झाली आहे. अयोध्येत राम मंदिराची स्थापना झाल्याने रामराज्य उभे राहिले आहे.
दरम्यान उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले. यावेळी प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथजी, विकास ढगे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. विश्वस्त योगी निरंजननाथजी यांनी मंदिरातील सर्व माहिती योगी आदित्यनाथ यांना दिली.
आळंदीच्या पवित्र भूमीवर हा पूजनीय कार्यक्रम पूर्ण भव्यतेने आणि दिव्यतेने आयोजित करण्यात आला आहे. स्वामीजींनी गेली ७५ वर्षे वैदिक सनातन धर्मासाठी चिकाटीने आणि समर्पित प्रयत्न केले आहेत. हा महोत्सव पूज्य स्वामी श्री गोविन्ददेव गिरीजी महाराज यांनी हाती घेतलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी आहे. - योगी आदित्यनाथ