महाराष्ट्र चांगलाच तापला! मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट! जळगावात जमावबंदी लागू
By श्रीकिशन काळे | Published: May 26, 2024 06:11 PM2024-05-26T18:11:49+5:302024-05-26T18:12:44+5:30
धुळे, जळगाव, अकोला, चंद्रपूर, परभणी, हिंगोली, नांदेड पुढील ४८ तासांत उष्णतेची लाट येणार असून, सायंकाळी पावसाची शक्यता
पुणे : महाराष्ट्र चांगलाच तापू लागला असून, अकोला, जळगाव ही शहरे तापदायक ठरत आहेत. येथे ४५ अंशावर कमाल तापमान नोंदले जात आहे. म्हणूनच जळगावात तर १४४ कलम लागू करावे लागले आहे. येत्या पाच दिवसांमध्ये अकोला आणि चंद्रपुरात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
नैऋत्य मॉन्सूनची वाटचाल बंगालच्या उपसागाराच्या नैऋत्य, मध्य व ईशान्य भागात झाली आहे. कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस, तर मराठवाडा, विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात व विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे महाराष्ट् चांगलाच तापत आहे. विदर्भ, मराठवाड्यातील जिल्हे उष्ण झळांनी भाजून निघत आहेत. तर राज्यात यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद अकोल्यात झाली. पुढील पाच दिवस विदर्भातील अकोला, चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. देशामध्ये राजस्थानातील बारमेरमध्ये यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४८.८ अंश तापमान नोंदले गेले.
पाकिस्तान व अफगाणिस्तानमार्गे वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे वायव्य आणि मध्य भारतात उष्मा वाढत आहे. या उष्ण झळांनी नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. उकाड्याने चांगलाच घाम निघत आहे. राजस्थानपासून छत्तीसगडपर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान आहे. त्यामुळे पूर्व विदर्भात विजांसह वादळी पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे. दरम्यान, चंद्रपूर, अकोला जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तर कोकणातील पुढील तीन दिवस काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला. तसेच कोल्हापूर, सातारा आणि इतर भागात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला.
उष्णतेच्या लाटेचा इशारा
धुळे, जळगाव, अकोला, चंद्रपूर, परभणी, हिंगोली, नांदेड पुढील ४८ तासांत उष्णतेची लाट येणार असून, सायंकाळी पावसाची शक्यता आहे. यातील अकोला, चंद्रपुरात सर्वाधिक तापमान असेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
जळगावात १४४ कलम लागू
अकोल्यात आणि जळगावात कमाल तापमान ४५ अंशाच्या वर नोंदले जात आहे. त्यामुळे जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी २५ मे पासून ३ जूनपर्यंत १४४ कलम (जमावबंदी) लागू केले आहे. नागरिकांनी दिवसा उन्हात बाहेर फिरू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
देशामध्ये राजस्थान, पंजाब आणि विदर्भातील काही शहरांत उष्णतेची लाट आहे. अकोल्यात तर पुढील पाच दिवस उष्णतेची लाट येणार असून, जळगावातही तापमान ४५ अंशावर नोंदले जात आहे. जळगावात कलम १४४ लागू केले. हे पहिल्यांदाच ऐकत आहे. तापमान वाढल्याने अशा प्रकारचा निर्णय घेतल्याचे ऐकिवात नाही. परंतु, नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि त्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून या सूचना दिल्या असाव्यात. - डॉ. अनुपम कश्यपी, माजी प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे