बारामती येथे महाराष्ट्र कबड्डी संघाच्या सराव शिबिराला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:08 AM2021-03-30T04:08:32+5:302021-03-30T04:08:32+5:30
या वरिष्ठ पुरुष गट महाराष्ट्र कबड्डी संघाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी सचिव ...
या वरिष्ठ पुरुष गट महाराष्ट्र कबड्डी संघाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील व तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी हुनमंत पाटील यांनी खेळाडूंना कोरोनाविषयीची सर्व काळजी घेऊन सर्वस्व झोकून सराव करा. महाराष्ट्रासाठी राष्ट्रीय स्पर्धेतून पदक जिंकून आणा, आशा शुभेच्छा दिल्या. या उद्घाटन प्रसंगी डॉ.जितेंद्र आटोळे, राजेंद्र गोफने,अजिनाथ खाडे, मोहन कचरे, दत्ता चव्हाण व बारामती कराटे असोसिएशनचे प्रमुख रविंद्र कराळे,अभिमन्यू इंगुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिराचे आयोजन महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या वतीने असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे. याबाबत असोसिएशनचे सरकार्यवाहक आस्वाद पाटील, समन्वयक सचिन भोसले यांनी खेळाडूंचे भोजन,निवास प्रशिक्षणाची जागा इत्यादी गोष्टी बाबत लक्ष दिले असून बारामती स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने चांगल्या सोयी शिबिरातील खेळाडूंना दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
शिबिरामध्ये महाराष्ट्राचे नाव सुप्रसिद्ध अशा प्रो कबड्डी लीगमध्ये गाजविणारे महाराष्ट्राचे प्रो कबड्डीचे स्टार खेळाडू सिद्धार्थ देसाई, रिशांक देवाडिगा, गिरीश गिरनार, संकेत सावंत, पंकज मोहिते, विकास काळे, शुभम शिंदे, अजिंक्य पवार,कृष्णा मदने, नीलेश साळुंखे, ऋतुराज कोरवी, ओंकार जाधव, सुशांत साहिल, सुनील दुबिले, दादासो आव्हाड, उमेश म्हात्रे यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील २५ सर्वोत्कृष्ट खेळाडूंचे सराव शिबिर महाराष्ट्र संघाचे प्रमुख प्रशिक्षक प्रशांत सुर्वे सर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २८ मार्च ते ८ एप्रिलपर्यंत सराव करणार असून या शिबिरातील १२ सर्वोत्कृष्ट खेळाडू १३ एप्रिल ते १६ एप्रिल २०२१ दरम्यान अयोध्या,उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या ६८ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या संघातून खेळणार आहेत. आपल्या खेळाडूंकडून जास्तीत जास्त चांगली कामगिरी व्हावी याकरिता रोज सकाळ सत्र व सायंकाळ सत्र यावेळेत त्यांच्याकडून सराव करून घेण्यात येत आहे.
बारामती येथे वरिष्ठ पुरुष गट महाराष्ट्र कबड्डी संघाच्या सराव शिबिराचे उद्घाटन करताना मान्यवर व खेळाडू.
२९०३२०२१-बारामती-१५