चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचांचे निलंबन, रोहित पवार म्हणाले…
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 18:08 IST2025-04-15T18:07:49+5:302025-04-15T18:08:38+5:30
पंचांनी चुकीचा निर्णय दिला हे स्पष्ट दिसत होतं. आमच्यावेळी स्पर्धेत गालबोट लागलं नाही, पारदर्शकपणा होता.

चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचांचे निलंबन, रोहित पवार म्हणाले…
पुणे - ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील वादग्रस्त निर्णयावर अखेर कारवाई झाली असली, तरी यामागे मोठं राजकारण असल्याचा आरोप शरद पवार गटाचे नेते व आमदार रोहित पवार यांनी केला आहे. अहमदनगरच्या वाडिया पार्क मैदानावर २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या या स्पर्धेतील गादी विभागाच्या अंतिम सामन्यात वादग्रस्त निर्णय घेण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता.
पै. पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध पै. शिवराज राक्षे या कुस्तीत चितपट झाल्याचा निर्णय पंचांनी दिला. मात्र हा निर्णय अनेकांनी चुकीचा ठरवला. चौकशीनंतर मुख्य पंच नितिश कावलिया यांच्यावर तीन वर्षांची निलंबनाची कारवाई करण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार म्हणाले,'दोन वर्षांपूर्वी संघटना सुरू झाली. पंचांनी चुकीचा निर्णय दिला हे स्पष्ट दिसत होतं. आमच्यावेळी स्पर्धेत गालबोट लागलं नाही, पारदर्शकपणा होता. आता घेतलेल्या निर्णयात मोठं राजकारण दिसत आहे. दबावाखाली चुकीचे निर्णय घेतले जात आहेत. संघटनेत राजकारण वाढलं असून, आज झोपेतून जागे होऊन निर्णय झाल्यासारखं वाटतं.'
रोहित पवार यांनी लाडकी बहीण योजनेवरही टीका केली यावेळी रोहित पवार यांनी राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेवरही टीका केली. योजनेचा आकडा आधीच कमी होणार असल्याचं सांगितलं गेलं होतं. आता आकडा ८ लाखांवर गेला आहे. महिला फक्त निवडणुकीपुरत्या लक्षात घेतल्या जातात का, असा प्रश्न निर्माण होतो. दोन वेगवेगळ्या योजना असून, लाडकी बहीण योजनेतील महिलांचा मोठा आकडा लवकरच कमी केला जाणार आहे," असा इशाराही त्यांनी दिला. रोहित पवार यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्र केसरी व लाडकी बहीण योजना दोन्ही विषयांवर नव्याने चर्चा रंगण्याची शक्यता आहे.
यावेळी आमदार रोहित पवार यांनी बीडमध्ये माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर सरकारवर, प्रशासनावर आणि काही नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. बीड, मंगेशकर हॉस्पिटल, गुलाबराव पाटील यांच्यापासून ते अजित पवारांच्या भूमिकेवर त्यांनी रोखठोक भाष्य केलं. बीड ही पवित्र भूमी आहे, पण काही नेत्यांमुळे बीडचे नाव बदनाम झाले आहे. कराड यांना शिक्षा झाली पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. या प्रकरणात पोलिस खात्यातील आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास व्हावा,” अशी मागणी त्यांनी केली.
मंगेशकर हॉस्पिटलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मंगेशकर हॉस्पिटलसंदर्भात बोलताना रोहित पवार म्हणाले, “समित्यांमधून काही निष्पन्न होत नाही. जो दोषी आहे. डॉक्टर असो की संस्था, त्यावर कारवाई झाली पाहिजे. सगळ्या खासगी रुग्णालयांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सरकार अहंकारी आहे. लोक आता स्वतःच्या हक्कासाठी उभे राहत आहेत.
यावेळी त्यांनी गुलाबराव पाटील यांना टोला लगावला. गुलाबराव पाटील यांच्या 'सोन्याचा चमचा' वक्तव्यावर टीका करत रोहित पवार म्हणाले,“मी सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो असं कोणी म्हणालं, तरी त्याचा उपयोग नाही. तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात, काही तरी ठोस काम करा. शिक्षणात निर्णय घ्या, CBSE स्वीकारा, काहीतरी वेगळं करून दाखवा. एकनाथ शिंदे मोठे नेते आहेत, मग त्यांच्या मुलाने सोन्याचा चमचा घेऊन जन्म घेतला असं म्हणायचं का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
अजित पवारांच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण
माध्यमांनी अजित पवार यांची भूमिका बदलल्याचं भासवलं, त्यावर रोहित पवार म्हणाले, “मी अजितदादांचं भाषण ऐकलं नाही. त्यांनी काय बोललं माहित नाही. कुटुंबात काही निर्णय घेतले जातात, तसाच हा एखादा कौटुंबिक निर्णय असावा. मलाही कधी कधी काकांचा, आजोबांचा आशीर्वाद घ्यावा लागतो.”