महाराष्ट्र केसरी : गदा कुणाला, शिक्षकाच्या मुलाला की सैन्यातील जवानाला ?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 10:42 AM2020-01-07T10:42:05+5:302020-01-07T10:48:13+5:30
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत यंदा अंतिम सामन्यात लढणाऱ्या दोन्ही मल्लांसाठी ही कुस्ती अत्यंत महत्त्वाची
पुणे - छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात कुस्ती मल्लविद्येला मोठी परंपरा आहे. त्यामुळेच, महाराष्ट्र केसरी स्पर्धेलाही तितकचं महत्व आहे. जीम अन् फिटनेसच्या जमान्यातही गाव-खेड्यात कुस्ती आपलं वेगळंच अस्तित्व टिकवून आहे. ग्रामीण भागात तालमितल्या लाल मातीत आजही कुस्त्या होतात, गावा-गावात जत्रेला आजही कुस्तीचे फड रंगतात. त्यामुळेच, अवघ्या महाराष्ट्राचे विशेषत: ग्रामीण महाराष्ट्राचे लक्ष आज होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीकडे लागले आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत यंदा अंतिम सामन्यात लढणाऱ्या दोन्ही मल्लांसाठी ही कुस्ती अत्यंत महत्त्वाची अन् चुरशीची असणार आहे. कारण, दोघांपैकी एकाला पहिल्यांदाच 'महाराष्ट्र केसरीची मानाची गदा' मिळणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही महाराष्ट्र केसरी पैलवानांना चीतपट करत लातूरच्या शैलेश शेळके अन् नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर यांनी महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे, महाराष्ट्र केसरीची गदा मराठवाड्याला मिळणार की उत्तर महाराष्ट्राला याचीही उत्कंठा दोन्ही विभागातील कुस्ती शौकिनांना लागली आहे. मात्र, काहीही झालं तरी आंतरराष्ट्रीय क्रीड संकुलातही ही मानाची गदा जाणार आहे. कारण, महाराष्ट्र केसरीसाठी लढणारे दोन्ही मल्ल वस्ताद काकासाहेब पवार यांच्या तालमितले पैलवान आहेत.
लातूरचा शैलेश शेळके (आर्मी मॅन)
मूळ लातूर जिल्ह्यातील असणारा शैलेश शेळके गेली कित्येक वर्षे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे येथे अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. बॉम्बे इंजीनियरिंग वर्क्स खडकी पुणे या युनिटमध्ये भारतीय सैन्य दलाचा तो पैलवान आहे. सुभेदार सोपान शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने आजवर राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे. कुस्तीमध्ये आक्रमक असणारा शैलेश इतर पैलवानांप्रमाणेच वैयक्तिक जीवनात अतिशय विनम्र आहे. शैलेश हा यावर्षी अतिशय तुफानी कामगिरी करीत अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेला आहे.
मूळ अहमदनगरचा हर्षवर्धन सदगीर
मूळचा अहमदनगर जिल्ह्याचा सुपुत्र असणारा हर्षवर्धन सदगीर हा नाशिक जिल्ह्याकडून कित्येक वर्ष महाराष्ट्र केसरीचं प्रतिनिधित्व करणारा पैलवान आहे. हर्षवर्धन हा एका शिक्षकाचा मुलगा असून त्याचे आजोबा नामांकित पैलवान होते. पाच वर्षांपासून तो आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल वस्ताद अर्जुन वीर काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लविद्येचे धडे गिरवत आहे. यावर्षी शिर्डी येथे झालेल्या 23 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात त्याने पदक मिळवले आहे. तसेच वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा हरियाणा येथे सुद्धा त्याने पदकाची कमाई केली आहे. गतवर्षी जालना येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपांत्य फेरीत येऊनसुद्धा पैलवान हर्षवर्धनने स्पर्धेतून माघार घेतली होती. मात्र, यंदा महाराष्ट्र केसरीची गदा घ्यायचीच, अशा निर्धाराने हर्षवर्धन अंतिम फेरीपर्यंत पोहोचला आहे.
वस्ताद काकासाहेबांच्या तालमितच महाराष्ट्र केसरीची गदा
महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांसाठी काकासाहेब पवार हे नाव नवे नाही. ज्यांनी भारत देशाला आंतरराष्ट्रीय तब्बल 31 पदके मिळवून देऊन केंद्र शासनाचा "अर्जुन" पुरस्कार मिळवला. कुस्ती निवृत्तीनंतर ज्यांनी आंतरराष्ट्रीय पदकविजेता पैलवान राहुल आवारे, पैलवान उत्कर्ष काळे, पैलवान विक्रम कुराडे, यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय स्तरावरील व ऑलिंपिकच्या स्पर्धेतील पैलवान घडवले. तसेच अनेक राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पैलवान घडवले. "महाराष्ट्र केसरी"ची आजपर्यंत काकासाहेबांच्या क्रीडा संकुलात नव्हती. मात्र, यंदा महाराष्ट्र केसरीची गदा काकासाहेबांचा पैलवान वाजत-गाजत आपल्या तालमित घेऊन येणार आहे.