Kartiki Wari: यात्रे अलंकापुरा येती ! ते आवडी विठ्ठला !! कार्तिकी वारीनिमित्त आळंदीत लाखो भाविकांचा महामेळा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 09:38 AM2024-11-27T09:38:33+5:302024-11-27T09:39:31+5:30

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२८ व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविकांचा महामेळा अलंकापुरीत जमला आहे. साडेतीन लाखांहून अधिक भाविक आळंदीत दाखल झाले आहेत

maharashtra lakh of devotees in Alandi on the occasion of Kartiki Vari | Kartiki Wari: यात्रे अलंकापुरा येती ! ते आवडी विठ्ठला !! कार्तिकी वारीनिमित्त आळंदीत लाखो भाविकांचा महामेळा

Kartiki Wari: यात्रे अलंकापुरा येती ! ते आवडी विठ्ठला !! कार्तिकी वारीनिमित्त आळंदीत लाखो भाविकांचा महामेळा

भानुदास पऱ्हाड 

आळंदी : यात्रे अलंकापुरा येती ! ते आवडी विठ्ठला !! पांडुरंगे प्रसन्नपणे ! दिधले देणे हे ज्ञाना !!भूवैकंठ पंढरपूर ! त्याहुनी थोर महिमा या !! निळा म्हणे जाणोनि संता ! धावत येती प्रतिवर्षी !!

या अभंगाप्रमाणे इंद्रायणीतीरी टाळ-मृदुंगाचा निनाद, ‘ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष’ आणि भगवा झेंडा उंचावत फेर-फुगड्यामध्ये देहभान विसरून नाचणाऱ्या वारकऱ्यांमुळे अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. माउलींच्या पालखी नगरप्रदक्षिणेवेळी भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला. तत्पूर्वी मंगळवारी पहाटेपासूनच नगरप्रदक्षिणा मार्ग दिंड्या आणि पालख्यांमधील भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होता.

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२८ व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविकांचा महामेळा अलंकापुरीत जमला आहे. साडेतीन लाखांहून अधिक भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. कार्तिकी एकादशीनिमित्त पवित्र इंद्रायणीत स्नान करून लाखो भाविकांनी ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीचे डोळेभरून दर्शन घेतले. इंद्रायणी घाट, हैबतबाबा पायरी, पुंडलिक मंदिर, नृसिंह सरस्वती महाराज मंदिर, संत जलाराम मंदिर, राघवदास महाराज, ज्ञानेश्वर भिंत, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, पद्मावती मंदिर, गोपाळपुरा, विश्रांतवड आदी ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली आहे. दरम्यान, दुपारी साडेबाराच्या महानैवेद्यानंतर माउलींच्या चांदीच्या मुखवट्याची सजावट व पोशाख परिधान करण्यात आला. दुपारी दीडच्या सुमारास माउलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी महाद्वारातून बाहेर पडली. यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शनी मंदिरापासून फुलवाले धर्मशाळा, चाकण चौक, भैराबा चौकमार्गे निघालेला हा सोहळा हजेरी मारुतीजवळ येऊन काही वेळापुरता विसावला. या ठिकाणी सर्व दिंड्यावाल्यांची हजेरी घेऊन प्रत्येकी एक-एक अभंग सादर करून सोहळा पुढे मार्गस्थ झाला.

आजचे दैनंदिन कार्यक्रम : कार्तिक वद्य ।। १२ ।। द्वादशी.

पहाटे २ ते ३:३० : पवमान अभिषेक व दुधारती.
पहाटे ३:३० ते ४ : प्रांतधिकारी खेड यांच्या हस्ते पंचोपचार पूजा.

पहाटे ३:०० ते ६:०० : मुक्ताई मंडपात काकडा भजन नांदेडकर मंडळींची दिंडी क्र. १५
सकाळी ५ ते ११:३० : भाविकांच्या महापूजा (श्रींच्या चलपादूकांवर)

दुपारी १२:३० ते १ : महानैवेद्य
दुपारी ४ ते सायं. ७ : रथोत्सव

दुपारी ४ ते सायं. ६ : कीर्तन वीणा मंडप ह.भ.प. हरिभाऊ बडवे.
रात्री ८:३० ते ९:०० : धूपारती

रात्री ९ ते ११ : कीर्तन वीणा मंडप केंदूरकर
रात्री ११ ते १२ : खिरापत पूजा, प्रसाद वाटप - वीणा मंडप, फडकरी, मानकरी, दिंडी प्रमुख, सेवेकरी यांना नारळ प्रसाद वाटप श्रींचे गाभाऱ्यात

Web Title: maharashtra lakh of devotees in Alandi on the occasion of Kartiki Vari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.