ऊस गाळपात महाराष्ट्र देशात आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2020 02:15 AM2020-11-07T02:15:52+5:302020-11-07T02:16:29+5:30
sugarcane factory : महाराष्ट्रातून इथेनॉलसाठी वळवण्यात आलेल्या साखरेची अंदाजित मात्रा लक्षात घेता निव्वळ साखरेचे उत्पादन यंदा ९५ लाख टन होणे अपेक्षित आहे.
पुणे : दसऱ्यापासून वेग घेतलेल्या यंदाच्या ऊस गाळप हंगामात महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे. उसाचे एकूण गाळप ५४.६१ लाख टन झाले असून, यातून सव्वाचार लाख टन साखर उत्पादीत झाली आहे.
यातील सर्वाधिक म्हणजे २३.५७ लाख टन ऊस गाळप एकट्या महाराष्ट्राने केले आहे. सरासरी ७ टक्के उताऱ्यासह १.६५ लाख टन नव्या साखरेचे उत्पादन झाले आहे. महाराष्ट्रातून इथेनॉलसाठी वळवण्यात आलेल्या साखरेची अंदाजित मात्रा लक्षात घेता निव्वळ साखरेचे उत्पादन यंदा ९५ लाख टन होणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ते सुमारे साडेतेहतीस लाख टनांनी जास्त असेल. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी ही माहिती दिली.
नाईकनवरे यांनी सांगितले की, नोव्हेंबरच्या पाच तारखेपर्यंत देशपातळीवर आतापर्यंत १४९ साखर कारखाने सुरू झाले आहेत. गेल्या वर्षी याच दिवसापर्यंत देशात फक्त ३९ कारखाने सुरु झाले होते. यात महाराष्ट्रातील सर्वाधिक ६१ साखर कारखान्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटकात १८ कारखाने सुरू झाले आहेत. कर्नाटकात आतापर्यंत यंदा सुमारे साडेपंधरा लाख टन ऊसाचे गाळप होऊन १.३५ लाख टन साखर तयार झाली आहे.
उत्तर प्रदेशातल्या ५० कारखान्यांनी उसाचे गाळप सुरू केले आहे. उत्तर प्रदेशात ९.४१ लाख टन उसाचे गाळप होऊन ८० हजार टन साखरेचे उत्पादन सुरू झाले आहे. उत्तर प्रदेशात यंदाच्या हंगामाअखेरपर्यंत १२३ लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वाधिक ऊस आणि साखर उत्पादन करणारे राज्य आहे.