Maharashtra lockdown Pune: जमावबंदी ती सर्वसामान्य नागरिकांसाठी! पुण्यात भाजपकडून सरकारी आदेशाची पायमल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 01:10 PM2021-04-06T13:10:53+5:302021-04-06T13:36:54+5:30
भाजप वर्धापनदिनाचा कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह १५ हून अधिक नेत्यांची हजेरी
पुणे : मिनी लॅाकडाउनच्या पहिल्याच दिवशी भाजप शहर कार्यालयात वर्धापन दिनाच्या निमित्ताने भाजप नेत्यांनी जमावबंदीच्या नियमाला हरताळ फासला. दरम्यान सरकारने फसवणूक केली असुन विकेंड लॅाकडाउन ची चर्चा करुन पूर्ण लॅाकडाउन लावला असा आरोप यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीयांनी केला.
पुण्यात भाजपच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्षांसह जवळपास १५ नेते आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. पुण्यामध्ये आजपासून मिनी लॉकडाऊनला सुरुवात झाली. या नियमानुसार शहरात सकाळी ७ ते संध्याकाळी ६ दरम्यान शहरात ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र यायला परवानगी नाही. तरीदेखिल हे नेते कार्यकर्ते एकत्र आले. अर्थातच कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने करत असल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत.
या कार्यक्रमाला सध्याची सामाजिक राजकीय परिस्थिती लक्षात घेता थोड्याच लोकांना बोलावले आहे असे चंद्रकांत पाटील म्हणाले. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी जरी निर्बंधांना पाठिंबा दिला असला तरी पाटी यांनी त्याला आक्षेप घेतलाय. ते म्हणाले “ सरकारने फसवणूक केली आहे. त्यांनी फडणवीसाांना सांगितले होते की, विकेंड लॉकडाउन असेल. मात्र हा संपूर्ण लॅाकडाऊन आहे. गोरगरीबांच्या पोटाचे काय? व्यापारी देखील मला फोन करत आहेत. त्यांचा काहीच विचार केला जात नाही. “
याचवेळी बोलताना खासदार गिरीश बापट म्हणाले ,” हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होऊशकला असता.पण व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातुन हा कार्यक्रम करत आहोत.”
दरम्यान शहरातील परिस्थितीची आठवण करुन द्यायला ही नेते मंडळी विसरली नाहीत. कोरोनाच्या परिस्थिती बाबत सांगत शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले ,” आज व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन केले आहे. आपण त्या निमित्ताने लसीकरणालाठी मोहीम सुरु करत आहोत. पण राज्य सरकारचा मोगलाई लादायचा प्रयत्न चालला आहे. पीएमपीएमएल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय आम्ही मान्य करणार नाही. त्याला विरोध करणार. “
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले ,” कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही साधेपणाने आज साधेपणाने वर्धापन दिन साजरा करत आहोत. राज्यातील सामाजिक परिस्थिती पाहता त्यामध्ये सामाजिक भान जपलेलं आपल्याला दिसतंय.”