Maharashtra: राज्याला हिव‘ताप’, वर्षभरात साडेचार हजार रुग्ण, ६ मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 12:45 PM2023-09-18T12:45:00+5:302023-09-18T12:46:30+5:30
सर्व प्रकारच्या हिवतापांचा प्रसार ॲनॉफेलीस वर्गीय डासांद्वारे होतो...
पुणे : हिवताप (मलेरिया) हा डासांकडून फैलावणारा व प्रोटोझोआ या एककोशिकीय सूक्ष्मजीव म्हणजेच परजीवींमुळे होणारा आजार आहे. यामध्ये रुग्णाला थंडी वाजून ताप येताे. आपल्याकडे याला कारणीभूत ठरणाऱ्या डासांची संख्या नियंत्रणात नसल्याने या आजाराचे यावर्षी वर्षभरात राज्यात ४ हजार ४८१ रुग्ण सापडले असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
सर्व प्रकारच्या हिवतापांचा प्रसार ॲनॉफेलीस वर्गीय डासांद्वारे होतो. यामध्ये एक दिवसाआड किंवा डास चावल्यानंतर ७२ तासांनी ताप येतो. हिवतापामध्ये मुख्यतः ठरावीक वेळाने थंडी वाजते व ती थांबल्यावर ताप येताे. तसेच डोके दुखणे, स्नायूंमध्ये वेदना, घाम येणे ही लक्षणे दिसतात. पुढे, कोरडा खोकला आणि मळमळणे ही प्रमुख लक्षणे असतात.
राज्यात सर्वाधिक रुग्ण हे गडचिराेली, गाेंदिया, बृहन्मुंबई, ठाणे येथे आढळून येतात. राज्यात २०२० मध्ये १२ हजार ९०९ रुग्ण व १२ मृत्यू, २०२१ मध्ये १९ हजार ३०३ रुग्ण व १४ मृत्यू, २०२२ मध्ये १५ हजार ४५१ रुग्ण आणि २६ मृत्यू झाले आहेत. तर यावर्षी जानेवारी ते १४ सप्टेंबरअखेर १० हजार रुग्ण व ६ मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू हे २०२२ मध्ये झाले आहेत.
यामध्ये ‘प्लाझमाेडियम फॅल्सिपारम’ (पीएफ) हा धाेकादायक प्रकार आहे. यामध्ये मृत्यूची शक्यता जास्त असते. म्हणून या रुग्णांबाबत जास्त काळजी घ्यावी लागते. पीएफ रुग्णांवर वेळीच उपचार न झाल्यास मृत्यू ओढवताे. हा पॅरासाईटचा एक प्रकार हा माणसांच्या शरीरातील अंतर्गत अवयवात वाढताे. मेंदूच्या वाहिन्यांत वाढताे व मार्ग ब्लाॅक करताे. त्यामुळे मेंदूचे पूर्ण नियंत्रण रुग्ण गमावून बसताे. हे रुग्ण आदिवासी भागात जास्त आढळतात. नाॅर्मल मलेरिया आणि पीएफ या दाेन्हींचे उपचार वेगवेगळे आहेत. पीएफचे रुण बरे झाल्याची खात्री करावी लागते.
राज्यात हिवताप विरोधी उपाययोजना :
- राज्यातील प्रत्येक आदिवासी प्राथमिक आराेग्य केंद्राच्या ठिकाणी एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपलब्ध आहे.
- दुर्गम व अतिदुर्गम भागात हिवतापाच्या तात्काळ निदानासाठी रॅपिड डायग्नोस्टीक टेस्ट किटचा पुरवठा शासनामार्फत केला जातो.
अळीनाशक फवारणी : नागरी हिवताप योजनेअंतर्गत राज्यातील निवडक १५ शहरांमध्ये अळीनाशकांची फवारणी करण्यात येते.