लाडका बाप्पा सातासमुद्रापार; बेल्जियममध्ये घुमतोय ढोल-ताशा अन् रंगतोय उत्सव गणरायाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 05:46 PM2024-09-16T17:46:50+5:302024-09-16T17:47:35+5:30
महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून वर्षभर मोठ्या प्रमाणावर सामाजिक, कलाविषयक उपक्रम राबविले जात असून महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडविले जात आहे
पिंपरी : गणरायाचा उत्सव आता सातासमुद्रपार पोहोचला आहे. महाराष्ट्रीय मंडळींकडून युरोपियन देशांमध्येही मोठ्या उत्साहाने उत्सव साजरा होत आहे. बेल्जियममध्ये महाराष्ट्र मंडळाच्या वतीने महाराष्ट्र मल्हार पथकाच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू आहे.
नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने बेल्जियममध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून वर्षभर मोठ्या प्रमाणावर सामाजिक, कलाविषयक उपक्रम राबविले जातात. त्यातून महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडविले जात आहे.
लाडका बाप्पा सातासमुद्रापार; बेल्जियममध्ये घुमतोय ढोल-ताशा अन् रंगतोय उत्सव गणरायाचा#pune#GanpatiBappaMoraya#Belgiumpic.twitter.com/FqM93Q6clH
— Lokmat (@lokmat) September 16, 2024
बेल्जियममधील ब्रुसेल्स शहरामध्ये २०१६ पासून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातील तरुण-तरुणींनी एकत्र येऊन महाराष्ट्र मल्हार पथक स्थापन केले. या पथकाच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक, कला आणि क्रीडाविषयक कार्यक्रम आयोजित केले जातात. आता या भागात गणरायाचा उत्सव लोकप्रिय होत आहे. या उत्सवात मोठ्या प्रमाणावर युरोपियन नागरिकही सहभागी होत आहेत. तीन दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जातो. आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तृप्ती वाघमारे, शिरीष वाघमारे, सचिन गावकर, तश्मी कदम, स्नेहल भोसले आयोजन करतात. संयोजक तृप्ती वाघमारे मालेगाव येथील रहिवासी आहेत. त्या २०१० पासून बेल्जियममधील आयटी कंपनीत नोकरी करीत आहेत.
भारतीय आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शन या परिसरातील नागरिकांना घडावे, तसेच महाराष्ट्रातील येथे राहणारे नागरिक एकत्र यावेत, यासाठी महाराष्ट्र मल्हार पथकाच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आम्ही सुरू केली आहे. पूर्वी या भागात असा कोणताही उत्सव साजरा होत नव्हता. तो आम्ही सुरू केला. त्यातून संस्कृतीचे आदान-प्रदान होते. शिवमुद्रा पथकाच्या धर्तीवर ढोल-ताशा वादनाचा इव्हेंटही आयोजित केला जातो. त्यात बेल्जियममधील नागरिकही सहभागी होतात. - तृप्ती वाघमारे