Maharashtra: राज्यातील किमान तापमान घटणार; थंडी कायम राहणार, हवामान विभागाचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 10:37 AM2023-12-22T10:37:24+5:302023-12-22T10:38:05+5:30
उत्तरेकडून महाराष्ट्रावर येणाऱ्या वाऱ्याचा वेग ताशी १० ते १२ किमी आहे. त्यामुळे थंडी जाणवत आहे....
पुणे : उत्तरेकडील वाऱ्यांमुळे राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पुण्यात किमान तापमान कमी होऊन थंडी वाढू शकते, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. कमाल तापमानात वाढ झाली आहे. उत्तरेकडून महाराष्ट्रावर येणाऱ्या वाऱ्याचा वेग ताशी १० ते १२ किमी आहे. त्यामुळे थंडी जाणवत आहे.
विदर्भ व उर्वरित महाराष्ट्रातील थंडी देणाऱ्या ह्या पहाटेच्या तापमानातील फरक हा सध्याच्या असमान हवेच्या दाबातील फरक यामुळे थंडीचे हे सातत्य टिकून आहे. २२ डिसेंबरपासून अजून एक नवीन पश्चिमी झंझावात उत्तर भारतात पश्चिमी हिमालयीन क्षेत्रात आदळण्याच्या शक्यतेमुळे डिसेंबरअखेर पर्यंत महाराष्ट्रात थंडी कायम राहू शकते.
मुंबईसह कोकणातील सात व सांगली, कोल्हापूर, दक्षिण सातारा अशा १० जिल्ह्यांत पहाटेचे किमान तापमान १६ डिग्रीच्या आसपास म्हणजे सरासरीपेक्षा दोन डिग्रीने अधिक जाणवत आहे. उर्वरित महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यात मात्र हे पहाटेचे किमान तापमान ११-१२ डिग्रीच्या आसपास म्हणजे सरासरीपेक्षा एक ते दीड डिग्रीने अधिकच जाणवत आहे.
पुण्यातील किमान तापमान गेल्या आठवड्यापासून १० ते १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहत आहे. कमाल तापमानात काही अंशी वाढ दिसून येत आहे. शिवाजीनगरमध्ये कमाल तापमान २८.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यामुळे दुपारच्या वेळी काही प्रमाणात उष्णता आहे.
पुण्यातील किमान तापमान
पाषाण : १२.८
हवेली : १३,१
एनडीए : १४.४
शिवाजीनगर : १४.९
कोरेगाव पार्क : १८.२
मगरपट्टा : १९.०
वडगावशेरी : १९.८