Maharashtra: मान्सूनने महाराष्ट्र व्यापला, जूनअखेरचे दिवस पावसाचे! विश्रांतीनंतर पावसाचा जोर वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 10:33 AM2024-06-24T10:33:33+5:302024-06-24T10:34:56+5:30
राज्यामध्ये गेल्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर आता मान्सूनच्या खंडानंतर, महाराष्ट्रात पाऊस सुरू होणार आहे....
पुणे : मान्सूनने रविवारी (दि. २३) संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. तसेच, सह्याद्री घाटमाथ्यावरदेखील मान्सूनचा वावर जाणवू लागला आहे. त्यामुळे रविवारपासून शेवटच्या संपूर्ण आठवड्यात म्हणजे रविवार, ३० जूनपर्यंत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला.
राज्यामध्ये गेल्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर आता मान्सूनच्या खंडानंतर, महाराष्ट्रात पाऊस सुरू होणार आहे. त्याचे स्वरूप पूर्वमोसमी वळीव स्वरूपातील गडगडाटी पावसासारखे असण्याची शक्यता आहे. गेल्या पाच दिवसांपासून म्हणजे मंगळवार, १८ जूनपासून मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. जूनच्या ह्या शेवटच्या आठवड्यातसुद्धा मुंबईसह संपूर्ण कोकणात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता ही अजूनही कायम टिकून आहे. तर मुंबई शहर, उपनगर, व कोकणात ह्या आठवड्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
गेल्या चार दिवसांपासून म्हणजे गुरुवार, २० जूनपासून, संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यात, पावसाने मध्यम ते जोरदारपणे हजेरी लावली आहे. मान्सून बंगाल उपसागरीय शाखेच्या सक्रियतेमुळे आता जूनच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. मान्सून अरबी समुद्रीय शाखाही काहीशी ऊर्जितावस्थेत आली आहे. त्यामुळे मान्सून साधारण एक किमी उंचीचा सह्याद्री घाट चढून घाट माथ्यावर वावरताना जाणवत आहे. त्यामुळे मान्सून खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा १० जिल्ह्यांत रविवारपासून जूनअखेरपर्यंतच्या संपूर्ण आठवड्यात मध्यम ते जोरदार, पावसाची शक्यता जाणवते.
चार जिल्ह्यांत कमी पाऊस
नाशिक, नगर, पुणे व छत्रपती संभाजीनगर अशा चार जिल्ह्यांच्या काही भागांत जून अखेरपर्यंतच्या आठवड्यात, सरासरीपेक्षा, महाराष्ट्रातील उर्वरित भागाच्या तुलनेत, पावसाचे प्रमाण, काहीसे, कमी असण्याची शक्यता जाणवते.
मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यांत आजपासून पुढील चार दिवस म्हणजे बुधवार दि २६ जूनपर्यंत मध्यम पावसाचीच शक्यता आहे. गुरुवार २७ ते ३० जूनच्या चार दिवसांत मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळता उर्वरित ७ जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढू शकतो. धाराशिव, लातूर अशा दोन जिल्ह्यांत व लगतच्या परिसरात कदाचित आजपासूनच जोरदार पावसाची शक्यता नाकारता येत नाही.
- माणिकराव खुळे, सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ