Maharashtra: उत्तरी वाऱ्यामुळे राज्यातील थंडीत वाढ होणार, हवामान विभागाचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 12:06 PM2024-02-04T12:06:18+5:302024-02-04T12:06:26+5:30
पुण्यात किंचित किमान तापमानात वाढ झाली आहे....
पुणे : उत्तर भारतावर जोरदार थंड हवा आहे. वाऱ्याची चक्रीय स्थिती नैऋत्य राजस्थानवर आहे. त्यामुळे राज्यामध्ये पुढील पाच ते सात दिवस हवामान कोरडे राहील. किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. उत्तरी वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. पुणे व परिसरात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. पुण्यात किंचित किमान तापमानात वाढ झाली आहे.
पुढील तीन दिवस म्हणजे २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान कमाल व किमान तापमानात वाढ होऊन थंडी काहीशी कमी होण्याची शक्यता असून, खान्देशातील नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेकडील परिक्षेत्रात ह्या तीन दिवसात काहीसे ढगाळ वातावरण राहू शकते, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
येत्या दोन दिवसात पश्चिम हिमालयीन क्षेत्रात पुन्हा नवीन येऊ घातलेल्या पश्चिमी झंझावाताच्या परिणामातून, सोमवार दि.५ फेब्रुवारी ते रविवार दि.११ फेब्रुवारीपर्यंतच्या संपूर्ण आठवडाभर कमाल व किमान तापमानाचा पारा घसरून महाराष्ट्रात पुन्हा चांगलीच थंडी पडण्याची शक्यता जाणवते. मात्र, हिवाळी हंगामासाठीचे कदाचित हे शेवटचेच थंडीचे आवर्तन ठरण्याचीही शक्यता नाकारता येत नाही, असेही खुळे म्हणाले.
पुणे शहरातील किमान तापमान
एनडीए : ११.५
शिवाजीनगर : १२.६
पाषाण : १३.४
हडपसर : १५.८
कोरेगाव पार्क : १७.१
मगरपट्टा : १८.०
वडगावशेरी : १९.५