Maharashtra: परीक्षार्थींची संख्या वाढली! यंदा १६ लाख विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा
By प्रशांत बिडवे | Published: February 29, 2024 12:30 PM2024-02-29T12:30:04+5:302024-02-29T12:32:16+5:30
गतवर्षी १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेला नोंदणी केली होती...
पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्येत यंदा वाढ झाली आहे. यावर्षी एकूण १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये ८ लाख ५९हजात ४७८ विद्यार्थी, ७ लाख ४९ हजार ९११ विद्यार्थीनी आणि ५६ तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गतवर्षी १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेला नोंदणी केली होती.
राज्य मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) ची लेखी परीक्षेला उद्यापासून दि. १ मार्च सुरुवात होणार आहे. दि. १ ते २६ मार्च या कालावधीत परीक्षा पार पडणार आहेत. परीक्षेसाठी एकूण २३ हजार २७२ माध्यमिक शाळांमधून १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे.
राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ५ हजार ८६ मुख्य केंद्रांवर दहावीची परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनुराधा ओक यांनी दिली.