महाराष्ट्र पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर - देवेंद्र फडणवीस

By नितीन चौधरी | Published: October 18, 2023 06:59 PM2023-10-18T18:59:13+5:302023-10-18T19:00:52+5:30

राज्यात सत्ता बदलामुळे पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Maharashtra once again ranks first in foreign investment Devendra Fadnavis | महाराष्ट्र पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर - देवेंद्र फडणवीस

पुणे : जगभरात सध्या भारताकडे गुंतवणुकीचे एक मोठे स्थान म्हणून बघितले जात आहे. त्यातही राज्यात गुंतवणुकीसाठी विचारणा होत असून त्यात पुण्याचाही समावेश आहे. युती सरकारच्या काळात महाराष्ट्र गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकाचे राज्य होते. मध्यंतरीच्या दोन वर्षांच्या काळात हा क्रमांक इतर राज्यांनी हिरावून घेतला. मात्र, आता पुन्हा एकदा महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पुण्यातील जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पदार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भुषण स्वामी, बँकेचे अध्यक्ष रवींद्र हेजीब, उपाध्यक्षा अलका पेटकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप व्यासपीठावर उपस्थित होते. ते म्हणाले, “कोरोना काळात चीनने जगाची पुरवठा साखळी विस्कळीत केली. त्यामुळेच अनेक देशांनी चीनसह अन्य ठिकाणी देखील सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधण्यास सुरुवात केली. जगाची फॅक्टरी तसेच पुरवठा साखळी ही भारतात निर्माण होऊ पाहत आहे. त्यामुळे अनेक देशांना भारतात उद्योग सुरू करावे असे वाटत आहे.”

पुणे ही देशाची आयटी नगरी तसेच मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून ओळखले जाते. त्यामुळे राज्यात दर आठवड्याला गुंतवणुकीसाठी विचारणा होत असल्याचे सांगून त्यातील अनेक जण पुण्यातही भेट देत असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. गेल्या युती सरकारच्या काळात महाराष्ट्र गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर होते. त्यातील एका वर्षी देशातील एकूण गुंतवणुकीपैकी ४२ टक्के तर दुसऱ्या वर्षी ४९ टक्के गुंतवणूक राज्यात झाली होती. मध्यंतरीच्या दोन वर्षांच्या काळात महाराष्ट्राचा हा क्रमांक हिरावला गेला, अशी टीका करत कर्नाटक व गुजरातमध्ये ही गुंतवणूक झाली. त्यानंतर झालेल्या सत्ता बदलामुळे राज्यात पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या तिमाहीतही राज्यात सर्वाधिक परकीय गुंतवणूक झाली असून महाराष्ट्र पुन्हा एकदा गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आल्याचे फडणवीस म्हणाले.

Web Title: Maharashtra once again ranks first in foreign investment Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.