Maharashtra: आराेग्य विभागात झाल्या ऑनलाइन बदल्या; पहिल्यांदाच बदली प्रक्रियेत एआयचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 12:41 PM2023-06-19T12:41:52+5:302023-06-19T12:42:13+5:30
बदली प्रक्रियेत एआयचा वापर...
पुणे : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या इतिहासात प्रथमतः फेसलेस, पारदर्शक पद्धतीने व आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून सॉफ्टवेअरद्वारे बदल्यांची प्रक्रिया करण्यात आली. यामधून गट-क संवर्गातील एकूण २ हजार ४७१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या कर्मचाऱ्यांना मोबाइलवर सहजपणे बदली आदेश उपलब्ध झालेले आहेत. तर, यापैकी २ हजार २८१ (९२ टक्के) बदल्या कर्मचाऱ्यांना पसंती क्रमांकानुसार पदस्थापना देण्यात आलेल्या आहेत.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निरपेक्षपणे व तत्परतेने बदल्या होण्याकरिता ऑनलाइन बदल्यांबाबत सॉफ्टवेअर तयार करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार या बदल्या करण्यात आल्या असल्याची माहिती साथराेग सहसंचालक डाॅ. बबिता कमलापूरकर यांनी दिली.
यामध्ये गट ‘अ’ व गट ‘ब’ च्या बदल्याही ऑनलाइन करण्यात आल्या. यासाठी ई बदली ॲप सॉफ्टवेअरमध्ये कर्मचाऱ्यांची माहिती भरण्याबाबत सांगण्यात आले हाेते. या बदली ॲपमध्ये संबंधित आरोग्य संस्थांकडून कर्मचाऱ्यांची कार्यरत ठिकाणे व रिक्त पदांची माहिती भरण्यात आलेली होती. तसेच कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुविधेनुसार बदली मिळावी म्हणून या सॉफ्टवेअरमध्ये बदलीपात्र कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता सूचीबाबत तसेच त्यांच्या अर्जाविषयी आक्षेप नोंदविण्याची सोय करण्यात आलेली होती.
संबंधित संस्था व नियंत्रण अधिकारी यांनी या आक्षेपाचे निराकरण करून तसे कळविण्यास ॲपमध्ये सुविधा पुरविण्यात आलेली होती. कर्मचाऱ्यांना त्यांचा अर्ज तपासण्याची सुविधा तसेच कर्मचाऱ्यांची बदलीशी संबंधित माहिती म्हणजे १० पसंतीक्रम किंवा विकल्प भरण्याची सोय व त्यांच्या अर्जाविषयी मोबाइल फोनवर संदेश प्राप्त होण्याची सुविधा ॲपमध्ये करण्यात आली होती. तसेच, ऑनलाइन रिक्त पदांची स्थिती, कर्मचाऱ्यांची स्वतःची माहिती कर्मचारी स्वतः तपासण्याची सुविधा ॲपमध्ये आहे.
बदली पात्र कर्मचाऱ्यांच्या अवघड क्षेत्र, बिगर अवघड क्षेत्र, प्राधान्यक्रम १ ते ७ मधील कागदपत्रांची पडताळणी करणे, कार्यरत पदावर या पूर्वीच्या कामावरील ठिकाण याचा विचार करून कर्मचाऱ्यांने मागणी केलेले पसंतीक्रम, विकल्प, संभाव्य रिक्त पदांबाबत शिफारस करण्याची सोय ॲपमध्ये उपलब्ध केली आहे. हे सर्व वर्गीकरण विक्रमी वेळेत ‘एआय’ च्या मदतीने करण्यात आले. तसेच या ॲपमध्ये बदलीबाबत काही तक्रारी असल्यास त्यासाठी ७ दिवसांचा वेळ देण्यात आलेला आहे.