महाराष्ट्र पोलिसांची नेहमीच केंद्र सरकारकडून प्रशंसा : पडसलगीकर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 04:18 AM2019-02-23T04:18:48+5:302019-02-23T04:19:14+5:30
एसआरपी जवान कष्टाने कामे करतात. देशात ज्या ज्या वेळेस जवानांची आवश्यकता लागते त्या त्या वेळेस केंद्र सरकार सर्वप्रथम महाराष्ट्रातील एसआरपी दलाची मागणी करते.
दौंड : महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाची प्रशंसा नेहमी केंद्र सरकार करीत असते. ही निश्चितच महाराष्ट्राला अभिमानाची बाब असल्याचे मत पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी व्यक्त केले. दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५ च्या विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
एसआरपी जवान कष्टाने कामे करतात. देशात ज्या ज्या वेळेस जवानांची आवश्यकता लागते त्या त्या वेळेस केंद्र सरकार सर्वप्रथम महाराष्ट्रातील एसआरपी दलाची मागणी करते. तेव्हा एसआरपी जवानांनी कर्तृत्वातून जो काही ठसा उमटवला आहे, त्याची परंपरा कायम ठेवावी, असे दत्ता पडसलगीकर म्हणाले. अपर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी म्हणाल्या, की एसआरपी जवानांना गौरवशाली परंपरा आहे. त्यानुसार कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून एसआरपी जवान नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. यावेळी पोलीस अधीक्षक अशोक मोराळे, पी. पी. बोरा, सुब्रोत, मुरली श्रीनिवासन, श्रीकांत पाठक, मनीषा दुबोले, नीलेश अष्टेकर, मनीष कुमार, सूरज महापात्रव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कमी शब्दांत बोलायची सवय झाली
या वेळी आमदार राहुल कुल आपल्या भाषणात म्हणाले, की सभागृहात कमी बोलायला मिळते. त्यानुसार कमीत कमी शब्दांत बोलायची मला सवय झाली आहे. त्यानुसार या कार्यक्रमाला नियोजित वेळेपेक्षा उशीर झाल्याने कमी शब्दांत माझे मत व्यक्त केले.