Maharashtra Police: पाईप बॅन्ड स्पर्धेत महाराष्ट्र पोलिसांना सर्वसाधारण विजेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 08:24 PM2023-12-13T20:24:37+5:302023-12-13T20:25:21+5:30
या स्पर्धेमध्ये पाईप बँड संघाने सलग सहावे सुवर्ण पदक मिळवून इतिहास घडवला आहे...
पुणे : गुजरातमधील गांधीनगर येथील अखिल भारतीय पोलिस बॅन्ड स्पर्धेत महाराष्ट्र राज्य पोलिस पाईप बन्ड संघाने दोन सुवणे, एक कास्य पदक मिळवून दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. गांधीनगर येथे ४ ते ८ डिसेंबर दरम्यान झालेल्या या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यातील पाईप बँडचे १३ संघ, ब्रास बँडचे १७ संघ, बिगुलचे १९ व महिला पाईप बँडचे ५ संघ सहभागी झाले होते.
दौंड, नानवीज येथील राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य व संघ व्यवस्थापक रामचंद्र केंडे यांच्या नेतृत्वाखाली पाईप बँड, ब्रास बँड व बिगुल असे ३ संघ व एकूण ८४ पोलीस अधिकारी व अंमलदार स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. अपर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद, विशेष पोलीस महानिरीक्षक अशोक मोराळे, पोलीस उपमहानिरीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी संघाला मार्गदर्शन केले होते.
या स्पर्धेमध्ये पाईप बँड संघाने सलग सहावे सुवर्ण पदक मिळवून इतिहास घडवला आहे. बेस्ट पाईप बँड कंडक्टर सहायक पोलीस हवालदार जी आर अंधारे यांनी वैयक्तिक सुवर्ण पदक पटकाविले. बिगुल संघाने सुवर्ण पदक मिळवले. ब्रास बँड संघाने कांस्य पदक मिळवून महाराष्ट्र पोलीस दलाने सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. ही कामगिरी राज्य राखीव पोलीस दलाने दुसर्यांदा केली आहे. पाईप बँड संघाने २०१६ पासून सलग ६ वेळा सुवर्ण पदक मिळवले आहे.