महाराष्ट्र पोलिसांचे संकेतस्थळ दहा दिवसांपासुन बंद; महासंचालकांकडे बारामतीच्या वकिलांची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 07:19 PM2020-06-04T19:19:29+5:302020-06-04T19:20:13+5:30
संकेतस्थळ बंद असल्याने सध्या वकील, पक्षकार, पत्रकार यासर्वांची मोठ्या प्रमाणात गैरसोय
बारामती : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देशभरात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्राथमिक माहिती अहवाल (एफ.आय.आर) २४ तासात अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र पोलिसांचे संकेतस्थळावर हे गुन्हे अपलोड केले जात असत. परंतु गेले ८-१० दिवस सदरील संकेतस्थळ बंद असल्याने या गुन्ह्यांची माहिती नागरिकांना मिळत नाही. तसेच इतरही ज्या सुविधा यासंकेतस्थळावर उपलब्ध आहेत त्याचा देखील वापर नागरिकांना करता येत नाही.याबाबत राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे बारामतीच्या वकिलांनी तक्रार केली आहे. अॅड. भार्गव पाटसकर यांनी याबाबत पोलीस महासंचालकांना निवेदन पाठविले आहे.यामध्ये पाटसकर यांनी बंद संकेतस्थळांमुळे सर्वसामान्यांसह वकील पक्षकारांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत असल्याने निदर्शनास आणले आहे.
त्यानुसार वकील, पक्षकार, पत्रकार तसेच इतर नागरिक देखील या संकेतस्थळाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. हे संकेतस्थळ बंद असल्याने सध्या यासर्वांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे .तसेच एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे देखील उल्लंघन होत आहे. तरी आपण यात लक्ष घालून हे संकेतस्थळ लवकरात लवकर चालू होण्याकरिता संबंधितांना योग्य त्या सूचना कराव्यात.तसेच आपल्या अखत्यारीत असणाऱ्या सर्व पोलिसांना संबंधित गुन्ह्यांची माहिती २४ तासात या संकेतस्थळावर अपलोड करण्यास सूचना कराव्यात ,अशी मागणी करण्यात आली आहे.
———————————