Maharashtra Rain: राज्यात पुढील आठवड्यापासून पाऊस बरसणार! मुंबईत उद्यापासून धो-धो
By श्रीकिशन काळे | Published: June 17, 2024 03:22 PM2024-06-17T15:22:05+5:302024-06-17T15:23:49+5:30
दरम्यान (१८ ते २२ जून)च्या पाच दिवसात विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर अश्या २९ जिल्ह्यांत मात्र केवळ तुरळक ठिकाणीच वर्तवलेल्या मध्यम पावसाचीच शक्यता ही तशीच कायम आहे...
पुणे : राज्यात मॉन्सून रेंगाळलेला असून, मंगळवारपाूसन (दि.१८) मुंबईत पावसाचा अंदाज आहे. पण उर्वरित राज्यामध्ये वरूणराजाची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. नेमकं पावसाला झाले तरी काय ? याविषयी ज्येष्ठ सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सविस्तर सांगितले आहे.
मजबूत अरबी समुद्रीय पश्चिमी वारे व किनारपट्टीवरील ३१०० मीटर उंचीवरचा हवेतील दक्षिणोत्तर हवेच्या कमी दाबाचा आसच्या अस्तित्वामुळे मंगळवारपासून (दि.१८ ते २५ जून) आठवडाभर, मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते.
शेष महाराष्ट्रात पाऊस स्थिती काय असेल?
दरम्यान (१८ ते २२ जून)च्या पाच दिवसात विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर अश्या २९ जिल्ह्यांत मात्र केवळ तुरळक ठिकाणीच वर्तवलेल्या मध्यम पावसाचीच शक्यता ही तशीच कायम आहे. उद्या व परवा (मंगळवार व बुधवार, १८, १९ जून ला) कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर गोंदिया गडचिरोली दोन दिवस मात्र जोरदार पावसाची शक्यताही नाकारता येत नाही.
जूनमध्येच मान्सून का थबकला?
दरवर्षी मान्सूनच्या आगमन व वाटचालीत त्याच्या प्रवाहात दिसणारा जून महिन्यातील कमकुवतपणा ह्यावर्षीही दिसून आला आहे. अरबी समुद्रावरून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर फक्त पश्चिमी बळकट मान्सूनी वारे वाहत आहे. ह्या व्यतिरिक्त मान्सूनच्या पावसासाठी विशेष अशी कोणतीही तीव्र स्वरूपातील वातावरणीय प्रणाली महाराष्ट्रासाठी जाणवली नाही. म्हणून महाराष्ट्रात मान्सून थबकल्याचे जाणवते.
मान्सूनच्या वाटचालीत विसंगती काय?
दरवर्षी, मान्सून प्रवाह, त्याच्या वाटचालीत, केरळ ते कर्नाटक प्रवासानंतर, जून मध्यावर सहसा, कमकुवत होवून, कर्नाटकातच मुक्काम ठोकत असे. पण ह्यावर्षी मात्र त्याने फक्त जागा बदलून, काहीसे पुढे येऊन त्याने महाराष्ट्रात मुक्काम ठोकला आहे. दोन दिवसाच्या फरकाव्यतिरिक्त, मान्सून त्याच्या सरासरी तारखेप्रमाणे त्याच्या वाटचालीत बरोबर आहे.
महाराष्ट्रातील मान्सून कुठे ?
सध्या कोकणात जरी जोरदार पाऊस होत असला तरी आजची स्थिती पाहता, महाराष्ट्रात अजूनही खान्देश, मराठवाडा, विदर्भात पूर्णतेने मान्सून पोहोचलेला नाही. गेल्या पाच दिवसा पासून मान्सूनच्या दोन्हीही शाखा जागेवरच खिळलेल्या दिसत आहेत.
चांगला पाऊस कधी?
सध्याचा कोकणातील ७ जिल्ह्यातील मान्सूनचा जोर पाहता, येत्या पाच दिवसानंतर म्हणजे पौर्णिमेदरम्यान महाराष्ट्रासाठी नक्कीच पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनची बंगाल शाखाही पूर्व भारतात पुढे झेपावणार आहे. तर मान्सूनची अरबी समुद्रीय शाखा सह्याद्रीवर चढाई करून, सह्याद्रीच्या पूर्वेकडील वर्षाछायेच्या प्रदेशात प्रवेश करण्याची शक्यता जाणवते. पौर्णिमेनंतर म्हणजे रविवार दि. २३ जुनपासून मान्सूनची सक्रियता वाढून राज्यात पाऊस सुरू होईल.