Maharashtra Rain: राज्यात दहा जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट; अमरावतीला रेड अलर्ट
By श्रीकिशन काळे | Published: September 15, 2023 08:10 PM2023-09-15T20:10:23+5:302023-09-15T20:10:54+5:30
येत्या १८ सप्टेंबरपासून मात्र राज्यातील पावसाची तीव्रता कमी होणार आहे. दोन दिवसांत चांगला पाऊस झाला तर राज्यात किमान काही भागातील दुष्काळाच्या सदृश्य स्थितीवर दिलासा मिळू शकणार आहे...
पुणे : राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये शनिवारी (दि.१६) व रविवारी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असून, अमरावती जिल्ह्यात रेड अलर्ट सांगितला आहे. तर विदर्भातील वर्धा, नागपूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, तसेच नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्टचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. येत्या १८ सप्टेंबरपासून मात्र राज्यातील पावसाची तीव्रता कमी होणार आहे. दोन दिवसांत चांगला पाऊस झाला तर राज्यात किमान काही भागातील दुष्काळाच्या सदृश्य स्थितीवर दिलासा मिळू शकणार आहे.
देशातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र पूर्व मध्यप्रदेश व लगतच्या भागावर आहे. येथून एक कमी दाबाचा पट्टा दक्षिण कोकणपर्यंत जात आहे. त्यामुळे उत्तर मराठवाडा, उत्तर पश्चिम विदर्भ महाराष्ट्र येथे दोन दिवस पावसाची तीव्रता वाढणार आहे. पश्चिमी वाऱ्याची तीव्रता जास्त असल्यामुळे राज्यात कोकण, गोवा, घाट माथ्यावर मुसळधारचा अंदाज आहे. तसेच मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण गोव्यात, १६ व १७ सप्टेंबरला तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे. पुढील पाच दिवस राज्यात आकाश ढगाळ राहणार आहे. तसेच पुणे व परिसरात पुढील सात दिवस ढगाळ वातावरण व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज देण्यात आला आहे. तर १६ व १७ सप्टेंबर रोजी घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट आहे.
रेड अलर्ट : अमरावती
ऑरेंज अलर्ट : नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, नागपूर, वर्धा, पालघर, ठाणे, रायगड, धुळे, नाशिक, जळगाव, पुणे, अकोला
राज्यातील पाऊस (मिमी)
जळगाव : ६
महाबळेश्वर : १
कोल्हापूर : ०.३
नाशिक : ०.४
छत्रपती संभाजीनगर : ५
अकाेला : ०.६
अमरावती : १४
बुलढाणा : ०१
गोंदिया : १३
नागपूर : १५
राज्यात उद्या (दि.१६) मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणच्या काही भागांमध्ये हळूहळू पाऊस वाढण्याची शक्यता आहे. पुढील ४,५ दिवस तीव्र पाऊस होणार असून, काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
- के. एस. होसळीकर, प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे