Maharashtra Rain| राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार; हवामान विभागाचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 12:44 PM2022-08-06T12:44:40+5:302022-08-06T12:52:44+5:30
पुणे शहरातही ९ ऑगस्टला तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज....
पुणे : मान्सूनला अनुकूल स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात पुढील पाच दिवस सर्वदूर पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. त्यानुसार कोकणातील रायगड, रत्नागिरी यासह पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे शहरातही ९ ऑगस्टला तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राजस्थानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा पसरला असून राज्याच्या तिन्ही बाजूंकडून चक्रावात स्थिती तयार झाली आहे. तसेच येत्या दोन दिवसांत बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा आणखी एक पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. जोडीला अरबी समुद्रावरून पश्चिमी वाऱ्यांचा जोर कायम आहे. या अनुकूल स्थितीमुळे पुढील दोन दिवसांत राज्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानंतरच्या तीन दिवसांत आणखी पाऊस वाढण्याचा अंदाज आहे.
राज्यात शुक्रवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर अन्य ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. राज्यात साडेपाचपर्यंतचा पाऊस (मिमीमध्ये) : वसई ९३, गुहागर व लांजा ८९, धुळे १११, सासवड ८९, देवळा ७५, राहता ६५, पारोळा ६३, आष्टी ११९, हदगाव ७५, मंगरुळपीर ७२, वाशिम ४२.
पुण्यात मध्यम पाऊस
पुणे शहरात पुढील तीन दिवस मध्यम स्वरूपाचा, तर मंगळवारी (दि. ९) तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. घाट परिसरात दोन दिवस मुसळधार व त्यानंतर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडेल. पुण्यात रात्री साडेआठपर्यंत झालेला पाऊस (मिमीमध्ये) : शिवाजीनगर १५.८, लोहगाव ५.८, चिंचवड २, लवळे १, मगरपट्टा ३.५.