Maharashtra Rain | यंदा पावसाची जोरदार बॅटींग! ११ जुलैलाच ओलांडली जून, जुलैची सरासरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 10:47 AM2022-07-12T10:47:02+5:302022-07-12T10:52:22+5:30
११ तारखेपर्यंत पावसाने जून व जुलैची सरासरीही ओलांडली...
पुणे : जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यानंतर हवामान विभागाचा अंदाज फोल ठरतोय की काय असे वाटत असताना जुलैच्या ११ तारखेपर्यंत पावसाने जून व जुलैची सरासरीही ओलांडली आहे. देशभरात मान्सून सरासरीच्या ५ टक्के अधिक बरसला असून राज्यातही सरासरीपेक्षा १९ टक्के जादा पाऊस पडला आहे. दक्षिण व मध्य भारतात सरासरीच्या चांगला पाऊस झाला आहे.
देशात मान्सून वेळेआधीच पोचला. मात्र, त्यानंतर त्याचा प्रवास रखडला. राज्यातही त्याची हजेरी दोन दिवसांनी उशिरा लागली. मान्सून तर आला पण पाऊस कुठाय, या प्रश्नाने शेतकरी हवालदिल झाले. जून महिन्यात राज्याच्या बहुतांश भागात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या रखडल्या. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार जूनमध्ये सरासरीइतका पाऊस पडण्याचा अंदाज होता. हा अंदाज मात्र खोटा ठरला. राज्याची जूनची सरासरी २०९ मिमी आहे. मात्र, यंदा राज्यात जून महिन्यात केवळ १४७.५ मिलिमीटर म्हणजेच ७० टक्के पाऊस पडला. कोकणात काही प्रमाणात पाऊस पडला पण उर्वरित राज्यात पावसाची प्रतीक्षा होती.
मराठवाड्यात ४३ टक्के जास्त पाऊस
जुलै महिन्यात राज्याची पावसाची सरासरी ३२१ मिमी असून ११ जुलैपर्यंत सरासरीच्या १९ टक्के जास्त पाऊस झाला. त्यामुळे उर्वरित जुलैत हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांतच हे प्रमाण २५ टक्क्यांपेक्षा जास्त होईल, अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागातील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांनी वर्तवली आहे. विभागनिहाय पावसाचा आढावा घेतल्यास आतापर्यंत मराठवाड्यात सर्वाधिक ४३ टक्के जादा पाऊस झाला आहे. मराठवाड्याची सरासरी १८८.४ मिमी असून प्रत्यक्षात २६९.८ पाऊस झाला आहे. तर कोकणाची सरासरी १०४०.५ मिमी आहे. विदर्भात सरासरी २६६.९ मिमी असून येथे २८८ मिमी पाऊस झाला आहे. सरासरीच्या तो ८ टक्के जास्त आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या ४ टक्के जास्त पाऊस झाला आहे.
पुणे शहरात सरासरी कमीच
पुणे शहरात मात्र सरासरी २२५.९ मिमी असून प्रत्यक्षात १६७.६ मिमी पाऊस पडला आहे. तो सरासरीच्या ५८.३ मिमीने कमी आहे. मात्र, पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा १४ टक्के जादा पाऊस झाला आहे. राज्यात केवळ सांगली व वाशिमचा अपवाद वगळता सर्वत्र सरासरीपेक्षा जादा पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात सरासरीच्या ७६ टक्के जास्त पाऊस झाला. सांगलीत सरासरीच्या ४६ टक्के कमी पाऊस झाला आहे. तर वाशिममध्येही सरासरीच्या २२ टक्के कमी पाऊस झाला आहे.
देशात तेलंगणात सर्वाधिक
देशभराचा विचार करता तेलंगणात सरासरीच्या ९५ टक्के जादा पाऊस झाला आहे. त्या खालोखाल तमिळनाडूत ४८, मेघालय व गुजरात ४४, आंध्र प्रदेश ३०, आसाम, गोवा, कर्नाटक प्रत्येकी २८, दादरा नगर हवेली २३, महाराष्ट्र १९, सिक्कीममध्ये १३ टक्के जास्त पाऊस झाला आहे.
राज्यातील पाऊस- जिल्हा फरक (-/ ) टक्के
मुंबई ९, रायगड ११, रत्नागिरी १४, सिंधुदुर्ग २८, पालघर ३३, ठाणे २१, नाशिक ५८, नंदूरबार ७, धुळे ४६, जळगाव ४, नगर ७, पुणे १४, सातारा ३, सांगली ४६, कोल्हापूर ४, सोलापूर ८, औरंगाबाद ४३, जालना १०, बीड ५६, परभणी ५३, लातूर ५३, उस्मानाबाद ३१, नांदेड ७६, हिंगोली ९, बुलडाणा ४, अकोला १२, वाशिम २२, अमरावती १, यवतमाळ १, वर्धा ३३, नागपूर २३, चंद्रपूर ३४, गडचिरोली ३७, भंडारा १, गोंदिया ७.
अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरावरून मोठ्या प्रमाणावर बाष्प येत असल्याने राज्यात पुढील चार दिवस असाच पाऊस पडेल. पावसाने जुलैची सरासरी ११ जुलैलाच ओलांडली आहे. महिनाभरात आणखी पावसाची शक्यता आहे.
- डॉ. अनुपम काश्यपी, प्रमुख, हवामान अंदाज विभाग