Maharashtra: विक्रमी! यंदा राज्यात डिसेंबरपर्यंत ५ हजार ७६३ कोटींचे पीककर्ज वाटप
By नितीन चौधरी | Published: February 3, 2024 06:35 PM2024-02-03T18:35:24+5:302024-02-03T18:35:54+5:30
गेल्या आर्थिक वर्षात (२०२२-२३) ५ हजार २० कोटी रुपये पीककर्ज देण्यात आले होते....
पुणे : जिल्ह्याने पीककर्ज वाटपामध्ये सलग तिसऱ्या वर्षी उच्चांक गाठला असून, यंदा (२०२३-२४) ३१ डिसेंबरपर्यंत ५ हजार ७६३ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. तर गेल्या आर्थिक वर्षात (२०२२-२३) ५ हजार २० कोटी रुपये पीककर्ज देण्यात आले होते.
यंदा जिल्ह्यात ५ हजार ५०० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानुसार ३१ डिसेंबरपर्यंतच उद्दिष्टापेक्षा २६३ कोटी रुपये अधिक कर्ज वाटप करून उद्दिष्टाच्या १०५ टक्के कामगिरी केली आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात २०२१-२२ मध्ये ३ हजार ८९३ कोटी व २०१५-१६ मध्ये ३ हजार ५०६ कोटी ३१ लाख रुपये कर्जवाटप करण्यात आले होते.
कर्जवाटपात मत्स्यव्यवसायासाठी २ कोटी २ लाख रुपये, तसेच पशुपालनासाठी १७ कोटी ७६ लाख रुपये कर्जपुरवठा करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त कृषी मुदत कर्जवाटपामध्येही ६ हजार ६ कोटी हजार रुपये कर्जवाटप झाले असून पीककर्ज व कृषी मुदत कर्ज मिळून कृषी क्षेत्रासाठी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत एकूण ११ हजार ७६९ कोटी रुपये कर्जवाटप करण्यात आले आहे.
कर्जवाटप आराखडा ८३ हजार कोटींवरून २ लाख २७ हजार कोटींपर्यंत
गेली तीन वर्षे वार्षिक पतपुरवठा आराखडा योजनेनुसार ठरविण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करून जिल्ह्यात कर्जवाटप करण्यात आले. २०२१-२२ मध्ये जिल्ह्यात ८३ हजार २९७ कोटींचे उद्दिष्ट असताना २ लाख ५ हजार २५९ कोटी आणि २०२२-२३ मध्ये १ लाख १७ हजार ७१६ कोटींचे उद्दिष्ट असताना २ लाख ७० हजार ९२५ कोटींचे कर्जवाटप झाले. त्या तुलनेत यावर्षी डिसेंबरअखेर २ लाख २३ हजार कोटींचे विक्रमी कर्जवाटप झाले असून, चालू आर्थिक वर्षामध्ये या वर्षाचे उद्दिष्ट ३१ डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्यात आलेले आहे. उर्वरित तीन महिन्यांच्या कालावधीत आणखी कर्जवाटप होणार असल्याने हादेखील नवा विक्रम ठरणार आहे. मागील तीन वर्षांत जिल्ह्याचा कर्जवाटप आराखडादेखील ८३ हजार कोटींवरून २ लाख २७ हजार कोटींपर्यंत वाढविण्यात आला असून, हादेखील एक विक्रम आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आर्थिक वर्षाच्या प्रारंभापासूनच सर्व बँकांचा वेगवेगळ्या स्तरांवर पाठपुरावा करण्यात आला. खरीप आणि रब्बी हंगामातील पीककर्जवाटपाबाबत वेळोवेळी बँकांची जिल्हापातळीवर बैठक घेऊन सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीयीकृत बँका, खासगी क्षेत्रातील बँका, तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जास्तीत जास्त पीक कर्जवाटपासाठी प्रोत्साहित केले.
- श्रीकांत कारेगावकर, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक