विद्यापीठाला महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे कवच, ६० जणांची प्रशिक्षित टीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:15 AM2018-04-12T00:15:17+5:302018-04-12T00:15:17+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या प्रशिक्षित ६० जवानांच्या सुरक्षेचे कवच नव्याने लाभले आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या प्रशिक्षित ६० जवानांच्या सुरक्षेचे कवच नव्याने लाभले आहे. त्याचबरोबर विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी पहिल्यांदाच १० युवती सुरक्षारक्षकांचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे रात्रीच्या वेळी विद्यार्थिनींची होणारी छेडछाड, विद्यापीठात राडारोडा आणून टाकणे, चोऱ्या अशा गैरप्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ४०० एकरचा मोठा कॅम्पस आहे. या कॅम्पसच्या सुरक्षेसाठी विद्यापीठाचा स्वत:चा सुरक्षा विभाग आहे. सुरक्षा विभागामध्ये लष्करातील निवृत्त अधिकारी व जवान कार्यरत आहेत. त्याचबरोबर सुरक्षा विभागाचे संचालक म्हणून निवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुरेश भोसले यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे.
पोलीस भरतीमध्ये प्रतीक्षा यादीत आलेल्या जवानांची महाराष्टÑ सुरक्षा मंडळामध्ये निवड करण्यात करण्यात येते. त्यानंतर त्यांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षित केले जाते. २५ ते ३० वय असलेले हे जवान आता विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी तैनात राहणार आहेत. महाराष्ट्र सुरक्षा बल ही मुंबईमध्ये मेट्रो, विमानतळ, टाटा रुग्णालय, मोनो रेल याबरोबरच राज्यातील महत्त्वाच्या देवस्थानांना सुरक्षा पुरवते.
विद्यापीठच्या आवारात एका प्रेमी युगुलाने विद्यापीठच्याच एका सुरक्षारक्षकाची गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाच्या सुरक्षा यंत्रणेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला सुरूवात झाली. त्यानंतर विद्यापीठाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याचे प्रयत्न करण्यात आले.
खासगी ठेकेदारांचे तसेच औद्योगिक सुरक्षा मंडळाच्या सुरक्षारक्षकांची सेवा विद्यापीठाकडून घेतली जात होती. मात्र, महाराष्टÑ सुरक्षा दलाचे जवान विद्यापीठासाठी उपलब्ध झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
ठगेगिरी करणाºयांवर ठेवणार वॉच
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाºया मुलांना मारहाण करण्याचे प्रकार कॅम्पसमध्ये अनेकदा घडले आहेत.
त्याचबरोबर रात्रीच्या वेळी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारातून वसतिगृहाकडे चाललेल्या विद्यार्थिनींची छेड काढण्याचे प्रकारही घडले आहेत.
अशी ठगेगिरी करणाºयांवर महाराष्टÑ सुरक्षा मंडळाचे प्रशिक्षित जवान वॉच ठेवणार आहेत. विद्यापीठ कॅम्पसमध्ये दिवस-रात्र ते गस्त घालणार आहेत.
।विद्यार्थिनींना मोठा दिलासा : पोलीस दलात तसेच अगदी लष्करातही महिला समर्थपणे त्यांची जबाबदारी पेलू लागल्या आहेत. यापर्श्वभूमीवर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सुरक्षा विभागातही युवतींना सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थिनींना त्यांचा मोठा आधार मिळणार आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी होणारे छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी या महिलारक्षकांची मोठी मदत होऊ शकेल.