प्रभाकर मांडे यांना मसाप जीवनगौरव पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 03:54 PM2018-05-17T15:54:20+5:302018-05-17T15:54:20+5:30

‘दुर्गा भागवत यांच्यानंतर लोकसाहित्याच्या व लोकसंस्कृतीच्या अभ्यासाची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. त्यांच्यापैकी डॉ. प्रभाकर मांडे हे महत्त्वाचे  संशोधक आहेत.

maharashtra sahitya parishad Jeevan Gaurav Award declare to Prabhakar Mande | प्रभाकर मांडे यांना मसाप जीवनगौरव पुरस्कार जाहीर

प्रभाकर मांडे यांना मसाप जीवनगौरव पुरस्कार जाहीर

googlenewsNext
ठळक मुद्देमसापचा ११२ वा वर्धापनदिन : प्रा. राजा शिरगुप्पे यांना डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारलोकसाहित्य आणि संस्कृतीच्या संशोधनासाठी त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल गौरव पिंपरी-चिंचवड शाखेला उत्कृष्ट मसाप शाखा पुरस्कार 

पुणे : लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक डॉ. प्रभाकर मांडे यांना यंदाचा मसाप जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. विद्रोही साहित्य चळवळीचे अध्वर्यू आणि सीमाभागातील कार्यकर्ते लेखक प्रा. राजा शिरगुप्पे यांना डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाला आहे. २७ मे रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११२ व्या वर्धापनदिन समारंभात परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ मूर्तिशास्त्रतज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते माधवराव पटवर्धन सभागृहात प्रदान करण्यात येणार आहे.
‘दुर्गा भागवत यांच्यानंतर लोकसाहित्याच्या व लोकसंस्कृतीच्या अभ्यासाची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. त्यांच्यापैकी डॉ. प्रभाकर मांडे हे महत्त्वाचे  संशोधक आहेत. डॉ.मांडेंनी लोकसाहित्य परिषदेची स्थापना करून लोकसाहित्याच्या अभ्यासकांना प्रोत्साहन दिले. लोकसाहित्य आणि संस्कृतीच्या संशोधनासाठी त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना 'मसाप जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित करताना परिषदेला समाधान वाटत आहे’, अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह उद्धव कानडे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. 
कसदार लेखन करताना महाराष्ट्रातील साहित्यासह सर्व चळवळींना वैचारिक अधिष्ठान देणारे लेखक-कार्यकर्ता आणि विद्रोही साहित्य चळवळीचे अध्वर्यू म्हणून प्रा. राजा शिरगुप्पे महाराष्ट्राला परिचित आहेत. सीमा भागातील मराठी बांधवांच्या संवेदनांशी एकरूप होऊन त्यांचे मनोबल वाढविणारा कार्यकर्ता म्हणून शिरगुप्पे यांची वेगळी ओळख आहे. लेखक- कार्यकर्ता या नात्याने वाङ्मयीन चळवळीत दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल परिषदेच्या डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. 
-----------------
पिंपरी-चिंचवड शाखेला उत्कृष्ट मसाप शाखा पुरस्कार 
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने राजा फडणीस पुरस्कृत उत्कृष्ट मसाप शाखा फिरता करंडक मसापच्या पिंपरी-चिंचवड शाखेला दिला जाणार आहे. रत्नाकर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मसाप कार्यकर्ता पुरस्कार रवींद्र बेडकिहाळ (फलटण) आणि गिरीश दुनाखे(सोलापूर) यांना २७ मे रोजी प्रदान करण्यात येणार आहे. हा समारंभ सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे, अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. 
 

Web Title: maharashtra sahitya parishad Jeevan Gaurav Award declare to Prabhakar Mande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.