Maharashtra Board: दहावी - बारावीच्या विध्यार्थ्यांना मोठा दिलासा; पेपर सोडवण्यासाठी जास्तीचा अर्धा तास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 10:46 AM2021-12-22T10:46:00+5:302021-12-22T10:46:09+5:30
मार्च -एप्रिल २०२२ मध्ये सर्व विषयांचे पेपर सकाळी ११ ऐवजी साडेदहा वाजता सुरू केले जाणार आहेत.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी - बारावीच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर झाले असून विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी वेळ वाढून देण्यात आला आहे. मार्च -एप्रिल २०२२ मध्ये सर्व विषयांचे पेपर सकाळी ११ ऐवजी साडेदहा वाजता सुरू केले जाणार आहेत.
राज्य मंडळातर्फे इयत्ता बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च तर इयत्ता दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या कालावधीत होणार आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण द्यावे लागत आहे. काही विद्यार्थी सध्या प्रत्यक्ष वर्गात जाऊन शिक्षण घेत आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव झालेला नाही. त्यामुळे राज्य मंडळाने लेखी परीक्षेसाठी वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेतला.
ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. वसंत काळपांडे म्हणाले, “मागील वर्षीसुध्दा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वाढीव वेळ देण्यात आला होता. विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव तुटला आहे. त्यामुळे राज्य मंडळाने घेतलेला निर्णय योग्य व विद्यार्थी हिताचा आहे.”
“या पूर्वी फेब्रुवारी-मार्च मध्ये घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा सकाळी अकरा वाजता सुरू केल्या जात होत्या. परंतु, मार्च -एप्रिल २०२२ च्या सर्व विषयांची परीक्षा आता सकाळी साडेदहा वाजता सुरू होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर लवकर पोहोचण्याबाबत काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना ७०, ८० व १०० गुणांच्या परीक्षेसाठी अर्धा तास तर ४०, ६० व ५० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटांचा वेळ वाढवून देण्यात आला असल्याचे राज्य मंडळ अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.''