Maharashtra: राज्यातील बालमृत्यू दर घटला; हजारी २२ वरून आला १८ वर
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: March 30, 2024 06:50 PM2024-03-30T18:50:44+5:302024-03-30T18:52:20+5:30
नवजात मृत्यूदर हा प्रति एक हजार १३ इतका हाेता, ताे आता ११ पर्यंत कमी झाला आहे....
पुणे : महाराष्ट्राच्या आराेग्य व कुटुंबकल्याण विभागाकडून माता व बालकांच्या आराेग्याची काळजी घेण्यासाठी विविध याेजना आणल्या. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, गेल्या काही वर्षांत बालमृत्यू दरात चांगली घट झाली आहे. केंद्र शासनाच्या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षण व अहवालानुसार, २०१८ मध्ये राज्याचा बालमृत्यू दर हा प्रति एक हजार २२ इतका हाेता, आता ताे १८ वर आला आहे. तर, नवजात मृत्यूदर हा प्रति एक हजार १३ इतका हाेता, ताे आता ११ पर्यंत कमी झाला आहे.
संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येयानुसार, सन २०३० पर्यंत नवजात मृत्यू दर १२ पेक्षा कमी करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. महाराष्ट्राने हे उद्दिष्ट २०२० मध्येच पूर्ण आहे. राज्यात राबवण्यात आलेल्या विविध माता व बाल आरोग्य संबंधित कार्यक्रमांमुळे राज्यात बालमृत्यू कमी झाल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये राज्याच्या कुटुंब कल्याण विभागाने गर्भवतींची आणि बालकांची काळजी घेण्यासाठी विविध याेजना आणल्या. यामध्ये जननी सुरक्षा याेजना, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी आदींचा उल्लेख करता येईल. जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत ० ते १ वर्ष वयोगटातील बालकांवर मोफत उपचार, आहार व संदर्भ सेवा या सुविधा देण्यात येतात. आरोग्य सेविका, आशा यांचे प्रशिक्षण घेण्यात आले.
५३ विशेष नवजात शिशू काळजी कक्ष स्थापन :
नवजात बालमृत्यू कमी करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ५३ विशेष नवजात शिशू काळजी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यामार्फत दरवर्षी अंदाजे ५० ते ६० हजार आजारी नवजात शिशू तसेच कमी वजनाच्या बालकांवर उपचार केले जातात. कक्षामध्ये ‘कांगारू मदर केअर पद्धती’चा वापर करण्यात येतो व उपचार करण्यात येतात. या उपक्रमाचा फायदा बालमृत्यू कमी हाेण्यासाठी झाला.
गृहभेटींद्वारे बालकांच्या आराेग्याचा आढावा
आशा कार्यकर्तीद्वारे राज्यातील सर्व नवजात बालकांची गृहभेट घेण्यात येते. त्याद्वारे आरोग्याची तपासणी व गंभीर बालकांना उपचारासाठी संदर्भित करण्यात येते. या कार्यक्रमाअंतर्गत दरवर्षी अंदाजे १० लाख नवजात शिशूंना गृहभेटी देण्यात येतात व अंदाजे ९० हजार आजारी बालकांचे निदान करून उपचार व संदर्भसेवा देण्यात येते.
राज्यातील बाल मृत्यूची आकडेवारी :
वर्ष - बालमृत्यू
2021-22 - 16,478
2022-23 - 15,150
2023-24 - 11,873
सन 2023-24 मधील महिनानिहाय बालमृत्यू
महिना - एकूण बालमृत्यू
एप्रिल - 1008
मे - 1089
जून - 1059
जुलै - 1180
ऑगस्ट - 1249
सप्टेंबर - 1266
ऑक्टोबर - 1205
नोव्हेंबर - 1019
डिसेंबर - 1058
जानेवारी - 945
फेब्रुवारी - 795