Maharashtra: उन्हाचा कडाका वाढणार, विदर्भात पावसाचा अंदाज!
By श्रीकिशन काळे | Published: March 21, 2024 05:42 PM2024-03-21T17:42:36+5:302024-03-21T17:43:38+5:30
पुढील दोन दिवसांत किमान व कमाल तापमानात १ ते २ डिग्री सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे....
पुणे : पुण्यातील कमाल तापमानात वाढ होत असून, दुपारी उन्हाचा चटका चांगलाच जाणवत आहे. तसेच राज्यातील मराठवाडा आणि विदर्भामधील अनेक ठिकाणी किमान व कमाल तापमानात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विदर्भात पावसाचा अंदाज असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. पुढील दोन दिवसांत किमान व कमाल तापमानात १ ते २ डिग्री सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.
आज राज्यामध्ये ढगाळ हवामान असून, तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटका, उकाडा जाणवत आहे. काही दिवस पावसाने हजेरी लावल्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात सकाळी गारवा जाणवत होता. पुणे शहरातही सकाळी व रात्री गारवा होता. पण आता पुण्यातही उष्णता वाढू लागली आहे. राज्यामधील अनेक ठिकाणी कमाल तापमान ३७-३८ अंश सेल्सिअसवर पोचले आहे. विदर्भात बुधवारी वाशिमल ३८ तर सोलापूर ३९ अंश सेल्सिवर पोचले होते.
दरम्यान, पश्चिम विदर्भ आणि परिसरावरील चक्राकार वाऱ्यांची स्थिती उत्तर तेलंगणावर सक्रिय आहे. या चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. मध्य प्रदेशापासून दक्षिण आसामपर्यंत हवेचा कमी दाब पट्टा कायम आहे.
उष्णतेमध्ये वाढ
पुणे शहरात आज शिवाजीनगरचे कमाल तापमान ३५.८ नोंदवले गेले असून, किमान तापमान १४.२ नोंदले आहे. सकाळपासूनच उष्णतेचा चटका पुणेकरांना जाणवू लागला आहे. हवेली, एनडीए याभागात मात्र किमान तापमान १३.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यामुळे सकाळी या ठिकाणी गारवा जाणवत आहे. दुसरीकडे वडगावशेरी, मगरपट्टा, हडपसर, कोरेगाव पार्कचे किमान तापमान २० व २४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले जात आहे.