Maharashtra: उन्हापासून बचाव करण्यासाठी घ्या 'ही' काळजी; पंधरा दिवसात उष्माघाताचे १३ रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 11:05 AM2024-03-28T11:05:42+5:302024-03-28T11:06:08+5:30
सर्वाधिक रुग्ण बीड जिल्ह्यात आढळले आहेत, तर पुण्यात अजून एकाही उष्माघाताच्या रुग्णाची नाेंद झालेली नाही...
पुणे : उन्हाचा पारा जास्तच चढू लागला आहे. उन्हाचा चटका वाढला असून, त्यापासून बचाव करण्यासाठी याेग्य त्या उपाययाेजना कराव्यात, अशा मार्गदर्शक सूचना आराेग्य खात्याने निर्गमित केल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसात राज्यात उष्माघाताचे १३ रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी सर्वाधिक रुग्ण बीड जिल्ह्यात आढळले आहेत, तर पुण्यात अजून एकाही उष्माघाताच्या रुग्णाची नाेंद झालेली नाही.
ऊन वाढल्याने डाेकेदुखी, चक्कर येणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे सकाळी ११ आणि दुपारी ४ नंतर आवश्यकता नसताना थेट उन्हात बाहेर पडू नये, तसेच बाहेर पडल्यास पांढऱ्या रंगाचे फुल बाह्यांचे कपडे घालावेत. डाेक्यात टाेपी घालावी, असेही मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेची लाट जाणवू लागली आहे. त्यामुळे उष्माघाताच्या त्रासाची शक्यताही वाढली आहे. गेल्या १५ दिवसात राज्यात १३ रुग्णांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण बीड येथील असून, येथील ४ रुग्णांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. त्यापाठाेपाठ रायगडमध्ये २ तर अहमदनगर, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, धुळे, सातारा येथे प्रत्येकी १ रुग्णाची नोंद झाली आहे, तर एकाही रुग्णाचा उष्माघाताने मृत्यू झालेला नाही.
राज्यात १ मार्च ते ३१ जुलैदरम्यान उष्माघाताचे सर्वेक्षण केले जाते. यासंदर्भात जिल्हा नोडल अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा साथरोग अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्हा, महापालिका आणि नगरपालिकांमध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर उष्माघातामुळे मृत्यू झाल्यास अन्वेषण करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
उष्णता विकाराची परिस्थिती पुढीलप्रमाणे :
वर्ष - राज्यातील उष्माघाताच्या रुग्णांची संख्या - मृत्यू
२०१५ - २८ - २
२०१६ - ६८६ - १९
२०१७ - २९७ - १४
2018 - 2 - 2
2019 - 9 - 9
2020 - 0 - 0
2021 - 0 - 0
2022 - 767 - 31
2023 - 3191 - 22