Maharashtra: तापमान तर वाढणार, पण पाऊसही पडणार! हवामान खात्याचा अंदाज
By नितीन चौधरी | Published: April 17, 2024 06:56 PM2024-04-17T18:56:57+5:302024-04-17T18:57:41+5:30
गुरुवारी व शुक्रवारी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे....
पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाच्या स्थितीमुळे गुजरातकडून कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात आर्द्रतायुक्त उष्ण वारे येत आहेत. त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरावरून छत्तीसगड तेलंगणामार्गे विदर्भातही आर्द्रतायुक्त उष्ण वारे येत असल्याने शुक्रवारी व शनिवारी राज्यात मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. तर गुरुवारी व शुक्रवारी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
वातावरणातील खालच्या स्तरातील द्रोणिका रेषा सध्या दक्षिण विदर्भापासून दक्षिण कोकणापर्यंत गेली असल्याने कोकणात तसेच मुंबईत कमाल तापमानात वाढ झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले. तसेच, आर्द्रतायुक्त उष्ण वाऱ्यांमुळे मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत आर्द्रता वाढल्याने उकाडा वाढला आहे. राज्यात गुरुवारी संभाजीनगर व बीड जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे तर नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना तसेच विजांच्या कटकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर शुक्रवारी व शनिवारी विदर्भात वादळी वारे तसेच मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
याबाबत हवामानतज्ज्ञ डॉ. अनुपम काश्यपी म्हणाले, “राज्यात कोकण व विदर्भात येत असलेल्या आर्द्रतायुक्त उष्ण वाऱ्यांमुळे दिवसा कमाल तापमानात वाढ झाली आहे. तर दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत ढगाळ वातावरणामुळे आर्द्रता वाढली असून उकाडा जाणवत आहे. परिणामी राज्यात पुढील पाच ते सात दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक अस्थिरतेमुळे हलक्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.”
पुणे व परिसरात सायंकाळी निर्माण होत असलेल्या ढगाळ वातावरणामुळे रात्री उकाडा वाढण्याची शक्यता आहे. सकाळी ११ ते दुपारी चार या दरम्यान किमान तापमानात देखील वाढ होत असल्याने सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होऊन मेघगर्जना विजांचा कडकडाट तसेच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हलक्या पावसाची शक्यता आहे असेही कश्यपी यांनी सांगितले. शहरात बुधवारी कमाल तापमान ३९.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.