Maharashtra: दोन वादळे, मात्र राज्यात पावसाची शक्यता नाहीच; हवामानशास्त्रज्ञांचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 08:54 AM2023-10-23T08:54:41+5:302023-10-23T08:57:16+5:30
ईशान्य मान्सून हा दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश, कर्नाटकाच्या काही भागात ऑक्टोबर ते डिसेंबर हे तीन महिने कार्यरत असतो....
पुणे : मान्सून परतला असून, आता ईशान्य मान्सूनचे काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु, बंगालच्या उपसागराच्या उत्तर क्षेत्रात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र व चक्रीवादळ निर्माण होऊन ते महाराष्ट्राच्या दिशेने येण्याची शक्यता मावळली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता नाही, असा अंदाज हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.
ईशान्य मान्सून हा दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश, कर्नाटकाच्या काही भागात ऑक्टोबर ते डिसेंबर हे तीन महिने कार्यरत असतो. यंदा ईशान्य मान्सून सरासरी इतकाच होईल, असा अंदाज आहे. या मान्सूनचा प्रभाव आणि बंगाल उपसागरातून येणारे एखादे-दुसरे चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात एखादा-दुसरा पाऊस या काळात होतो. पण यंदा मात्र शक्यता कमी आहे.
दक्षिणेमध्ये ईशान्य मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज आहे. उष्णता वाढल्याने नागरिकांना घाम फुटतो. सध्या अरबी समुद्रात केरळ राज्यातील कोचीन-अल्लेप्पी अक्षवृत्ताच्या दरम्यान लक्षद्वीप बेटांच्याही अती पश्चिमेकडे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. २६ ऑक्टोबरनंतर चक्रीवादळ निर्माण होईल, ते ओमानच्या दिशेने निघून जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये त्याने पाऊस होणार नाही, असे खुळे यांनी सांगितले.